प्रस्तावित नोकरकपातीचा विरोध करण्यासाठी ब्रिटनमधील भुयारी ‘टय़ूब’वाहतूक कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून दोन दिवसांचा संप पुकारल्याने लाखो प्रवाशांचे अतोनात हाल सुरू झाले आहेत. पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी या संपाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या संपामुळे लाखो लंडनवासीयांना प्रचंड मनस्ताप होत असल्याचे त्यांनी ट्विटवरवरून म्हटले आहे.
‘टय़ूब’ वाहतूक सेवेच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जमिनीवरील ट्रेनसेवा तसेच बससेवेवर कमालीचा ताण पडला. अतिरिक्त बससेवा तसेच ट्रेनसेवा वाढवूनही प्रचंड गर्दीमुळे वाहतूक व्यवस्था अस्ताव्यस्त झाली आहे.
या संपाच्या पाश्र्वभूमीवर परिवहन विभागाने लोकांना पर्यायी वाहतूक सेवेचा अवलंब करावा. तसेच शक्य तिथे पायी जावे,असे आवाहन केले आहे. ब्रिटनमधील हवामान बिघडल्यामुळे आधीच रेल्वेसेवेवर परिणाम झाला आहे. त्यातच आता टय़ूब वाहतूक कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.
लंडनच्या महापौरांनी शहरातील सर्व तिकीट कार्यालये बंद करण्याची आणि ९५० नोकऱ्यांमध्ये कपात करण्याची केलेली घोषणा मागे घ्यावी, या मागणीसाठी संपाचे हत्यार उगारण्यात आले आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले की, वाहतूक सेवेचे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे वर्षांकाठी ५० दशलक्ष पौंडांची बचत होईल, असा केला आहे. जमिनीखालून चालवण्यात येणारी ही वाहतूक सेवा ही जगातील सर्वात जुनी वाहतूक सेवा आहे. या वाहतूक सेवेचा रोज तीन दशलक्ष प्रवासी त्याचा फायदा घेतात.
दरम्यान, पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी या संपाबाबत ट्विटरवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संपामुळे लाखो लंडनवासी वेठीला धरले गेले असून हा प्रकार निंदनीय असल्याचे म्हटले आहे. त्यावर वाहतूक कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी पंतप्रधानांना आवाहन केले आहे.