पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅमेरा लेन्सवरील कव्हर न काढताच करत होते फोटोशूट? TMC नेत्याने शेअर केला फोटो, भाजपाचं प्रत्युत्तर

तृणमूल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो ट्विटरला शेअर करत उडवली खिल्ली

PM Narendra Modi
तृणमूल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो ट्विटरला शेअर करत उडवली खिल्ली

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे शनिवारी सकाळी ८च्या सुमारास नामिबियाहून विशेष बोईंग ७४७-४०० विमानाने चित्त्यांचे आगमन झाले. ग्वाल्हेरहून त्यांना भारतीय वायुसेनेच्या दोन हेलिकॉप्टरने श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानाजवळ पालपूरला आणले. उद्यानात एक मंच तयार करत त्याच्या खाली चित्त्यांचे पिंजरे ठेवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी ११.३० वाजता पिंजऱ्याचे दार उघडून तीन चित्त्यांना सोडले. त्यांनी या ठिपकेदार प्राण्याची छायाचित्रे एका व्यावसायिक कॅमेऱ्यातून टिपली. उर्वरित पाच चित्ते इतर मान्यवरांनी सोडले. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय पर्यावरण, वने व हवामानबदल मंत्री भुपेंदर यादव होते.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा छेडछाड करण्यात आलेला एक फोटो ट्विटरला शेअर करत त्यांची खिल्ली उडवली आहे. यानंतर भाजपाने त्यावर प्रत्युत्तरही दिलं.

अर्थव्यवस्था-पर्यावरणाची सांगड : मोदी; नामशेष चित्ते पुन्हा देशात, पंतप्रधानांच्या हस्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात मुक्तता

तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी म्हटलं की, “सर्व आकडेवारीवर झाकण ठेवणं ही एक गोष्ट आहे, परंतु कॅमेऱ्याच्या लेन्सवर झाकण ठेवणे ही निव्वळ दूरदृष्टी आहे”.

भाजपाने हा फोटो खरा नसल्याचं सिद्ध करत तात्काळ उत्तर दिलं. भाजपा नेते सुकांता मजुमदार यांनी फोटोमध्ये निकॉनचा कॅमेरा असून कॅनॉनचं कव्हर दिसत असल्याचं लक्षात आणून दिलं.

“तृणमूलचे राज्यसभा खासदार निकॉनच्या कॅमेऱ्यावर कॅनॉनचा कव्हर असणारा एडिटेड फोटो शेअर करत आहेत. खोटा प्रचार करण्याचा किती हा वाईट प्रयत्न आहे. ममता बॅनर्जींनी किमान थोडी माहिती असणाऱ्यांना तरी कामावर ठेवावं,” असा टोला त्यांनी लगावला आहे.

यानंतर काही वेळातच तृणमूलचे खासदार जवाहर यांनी ट्वीट डिलीट केलं.

भारतातून सात दशकांपूर्वी नामशेष झालेले चित्ते पुन्हा भारतीय भूमीवर दाखल झाले. नामिबियातून आणलेले पाच मादी आणि तीन नर चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात शनिवारी सोडण्यात आले. भारतातून नामशेष झालेले चित्ते पुन्हा देशात येणे हा एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच नामिबियाने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2022 at 07:42 IST
Next Story
लाखो मातांचे आशीर्वाद माझ्यासाठी ऊर्जा, प्रेरणा, संरक्षणकवच : मोदी; बचत गटांतील महिलांशी संवाद
Exit mobile version