नवीन ‘हिट अँड रन’ कायद्याच्या विरोधात देशातील माल वाहतूकदार आणि ट्रक चालक संपावर गेले आहे. भारतीय न्यायिक संहिता २०२३ मध्ये दुरूस्ती केल्यानतंर ‘हिट अँड रन’ प्रकरणात दोषी चालकाला ७ लाख रूपयांपर्यंत दंड आणि १० वर्षांपर्यंतच्या तुरूंगवासाची तरतूद करण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर ट्रक चालकांनी संपाचं हत्यार उपसलं होतं. मात्र, केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर अखिल भारतीय माल वाहतूक काँग्रेस संघटनेनं चालकांना कामावर रूजू होण्याचं आवाहन केलं असून संप मागे घेण्यात आला आहे.

अखिल भारतीय माल वाहतूक काँग्रेस संघटनेच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारशी चर्चा केली. या बैठकीनंतर गृहमंत्रालयाचे सचिव अजय भल्ला यांनी नवीन कायदा अद्याप लागू करण्यात आला नाही, अशी माहिती दिली.

“अखिल भारतीय माल वाहतूक काँग्रेस संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. नवीन कायदे अद्याप लागू करण्यात आलेले नाही. भारतीय न्यायिक संहिता १०६ (२) लागू करण्याआधी भारतीय माल वाहतूक काँग्रेस संघटनेशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल. अखिल भारतीय काँग्रेस आणि सगळ्या चालकांना संप मागे घ्यावा,” असं आवाहन अजय भल्ला यांनी केलं.

अखिल भारतीय माल वाहतूक काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष मलकित सिंग यांनी म्हटलं, “भारतीय न्यायिक संहिता १०६ (२) या कायद्यानुसार १० वर्षाची शिक्षा आणि दंड अद्याप लागू करण्यात आला नाही. चालकांनी कुठलीही काळजी करण्याची गरज नाही. ‘हिट अँड रन’ कायदा लागू होऊ देणार नाही. कायदा लागू झाल्यास आमच्या मृतदेहांवरून सरकारला जावं लागेल. चालकांनी पुन्हा कामावर रुजू व्हावं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मागील दोन दिवसांपासून माल वाहतूकदार, टँकरचालकांचा संप सुरू असल्यानं इंधनापासून ते भाजीपाला आणि अत्यावश्यक गोष्टींचा पुरवठा थांबला होता. अनेक ठिकाणी पेट्रोलपंप इंधनाअभावी ओस पडले होते. तर, नागरिकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावल्या होत्या. या संपाची धग तीव्र होत असताना केंद्र सरकारनं माल वाहतूकदारांच्या संघटनेला चर्चेसाठी बोलावलं. या चर्चेत संपाबाबत तोडगा काढण्यात आला.