वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला दिलेल्या करसवलतीत ९० दिवसांनी वाढ केली. अमेरिकेच्या निर्णयानंतर चीननेही करामध्ये कुठलेही बदल करणार नसल्याचे जाहीर केले. जागतिक अर्थव्यवस्थेत मोठे चढउतार होणे त्यामुळे तूर्तास टळले आहे. अमेरिकेने लागू केलेली कर सवलत मंगळवारी संपणार होती.

ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रूथ सोशल’वर पोस्ट करून सांगितले, ‘चीनला दिलेल्या करसवलतीमध्ये ९० दिवसांची वाढ करण्याच्या आदेशावर सही केली आहे. दोन्ही देशांतील करारांतील सर्व बाबी सारख्या असतील.’ चीनला दिलेली ही सवलत आता १० नोव्हेंबरपर्यंत असेल. चीनच्या वाणिज्य मंत्रालयानेही अमेरिकेच्या निर्णयानंतर करांची स्थिती जैसे थे ठेवणार असल्याचे जाहीर केले.

चीनबरोबर होत असलेल्या असमान व्यापारावर चर्चा सुरू असल्याचे ट्रम्प यांनी आदेशात म्हटले आहे. दोन्ही देशांमध्ये झालेल्या करयुद्धात अमेरिकेने चीनवर १४५ टक्के, तर चीनने अमेरिकेच्या वस्तूंवर १२५ टक्के कर सुरुवातीच्या काळात लावले होते. ही तणावपूर्ण स्थिती नंतर निवळली. अमेरिकेने चीनवर सध्या ३० टक्के, तर चीनने अमेरिकेच्या वस्तूंवर १० टक्के कर सध्या लागू केला आहे. दोन्ही देशांतील करस्थिती आहे तशीच राहणार असल्यामुळे चर्चेला आणखी वाव मिळणार आहे. या वर्षअखेर उभय देशांतील नेते परस्परांना भेटून मार्ग काढण्याची शक्यता आहे.