पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान पाच विमाने पाडण्यात आली. मे महिन्यात झालेल्या शस्त्रविरामानंतर परिस्थिती शांत झाली असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. व्हाईट हाऊसमधील काही रिपब्लिकन खासदारांसोबतच्या भोजनादरम्यान ट्रम्प यांनी हे विधान केलं आहे. मात्र, ही पाडली गेलेली विमानं भारताची होती की पाकिस्तानची हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा असा दावा केला की त्यांनी व्यापाराच्या नावाखाली दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमधील शस्त्रविराम घडवून आणला होता. दोन देशांमधील युद्धासारख्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांच्या प्रशासनाच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान केले.

“खरं तर विमानांवर हवेतून गोळीबार केला जात होता. मला वाटतं प्रत्यक्षात पाच विमानं पाडण्यात आली”, असे ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धाबाबत बोलताना सांगितले. मात्र याबाबत त्यांनी सविस्तर कोणतीही माहिती दिलेली नाही.

युद्धादरम्यान पाकिस्तानने हवाई हल्ल्यात पाच भारतीय विमानं पाडल्याचा दावा केला होता. याबाबत बोलताना भारतीय लष्करातील वरिष्ठ जनरल यांनी मे महिन्याच्या अखेरीस माहिती दिली होती की, युद्धाच्या पहिल्याच दिवशी हवाई हल्ल्यांदरम्यान नुकसान झाल्यानंतर भारताने रणनीती बदलली आणि तीन दिवसांनी शस्त्रविराम जाहीर होण्यापूर्वीच भारताला मोठं यश मिळालं होतं. भारतानेही पाकिस्तानची काही विमानं पाडल्याचा दावा केला होता. इस्लामाबादने कोणत्याही विमानांचे नुकसान झाल्याचे नाकारले मात्र त्यांच्या हवाई तळांचं मोठं नुकसान झाल्याचं मान्य केलं.

वॉशिंग्टनने दोन्ही देशांशी चर्चा केल्यानंतर १० मे रोजी सोशल मीडियावर जाहीर केलेल्या भारत-पाकिस्तानमधील शस्त्रविरामाचे श्रेय डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार स्वत:कडे घेतले. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान शस्त्रविराम करारासाठी व्यापार कराराला जबाबदार धरले, हा दावा भारताने मात्र फेटाळून लावला. नवी दिल्ली आणि इस्लामाबादने त्यांच्यातील समस्या थेट आणि कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय सोडवल्या पाहिजेत अशी भारताची भूमिका आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आशियातील चीनच्या प्रभावाला टक्कर देण्यासाठी वॉशिंग्टनच्या प्रयत्नांमध्ये भारतदेखील महत्त्वाचा भागीदार आहे, तर पाकिस्तान हा अमेरिकेचा मित्र आहे. काश्मीरमध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. नवी दिल्लीने या हल्ल्याचा आरोप पाकिस्तानवर केला, मात्र त्यांनी जबाबादारी नाकारली आणि तटस्थ चौकशीची मागणी केली. वॉशिंग्टननेही हल्ल्याचा निषेध केला मात्र त्याचा दोष थेट इस्लामाबादला दिला नाही. ७ मे रोजी भारतीय लष्कराने सीमेपलिकडे असलेल्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, ड्रोन हल्ले झाले आणि शस्त्रविरामाची घोषणा होईपर्यंत काही लोकांचा यादरम्यान मृत्यूही झाला.