वॉशिंग्टन, मॉस्को : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यादरम्यान बहुप्रतिक्षित अलास्कार शिखर परिषद कोणत्याही ठोस निष्कर्षाविना संपली. जवळपास तीन तास चाललेल्या या चर्चेअंती, युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही नेत्यांदरम्यान अपेक्षित करार झाला नाही. मात्र, चर्चेमध्ये प्रगती झाली असे ट्रम्प यांनी सांगितले. दुसरीकडे, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्यासाठी सोमवारी वॉशिंग्टन डीसीला जाणार आहेत.

दरम्यान, शस्त्रसंधीचा करार करण्यात अपयश आल्यानंतर, युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी शस्त्रसंधी करार करण्यापेक्षा शांतता करार करणे हा सर्वोत्तम मार्ग असेल असे मत ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केले. ट्रम्प यांच्याबरोबरच्या बैठकीमध्ये पुतिन युक्रेनविषयी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. तर, युक्रेनने युद्धसमाप्तीसाठी रशियाबरोबर करार करायला तयार व्हावे असा इशारा ट्रम्प यांनी दिला. “युक्रेनने रशियाबरोबरचे युद्ध संपवण्यासाठी करार करायला तयार व्हायला हवे, कारण रशिया खूप मोठी सत्ता आहे आणि ते नाहीत,” असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प-पुतिन भेटीनंतर झेलेन्स्की आणि नाटोच्या अन्य नेत्यांनी एकत्रितपणे ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून दीर्घ आणि ठोस चर्चा झाली. युद्धसमाप्तीसाठी रशियावरील दबाव कायम ठेवणे किंवा वाढवणे यावर युरोपीय देश ठाम आहेत.

रशिया आणि युक्रेन यांनी शस्त्रसंधी न करता थेट शांतता करार करावा यासाठी वाटाघाटी करणाऱ्यांनी चर्चा करावी, यावर माझे आणि पुतिन यांचे एकमत झाले. यामुळे युद्ध संपेल. केवळ शस्त्रसंधी अनेकदा टिकत नाही. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका

चर्चेकडे भारताचे लक्ष

अमेरिकेने लादलेल्या ५० टक्के आयातशुल्काच्या पार्श्वभूमीवर, भारताचे या बैठकीकडे बारकाईने लक्ष होते. दोन्ही नेत्यांमध्ये एखादा करार झाला असता तर त्यामुळे भारतावर पुन्हा आयातशुल्क लादण्याच्या ट्रम्प यांच्या इशाऱ्यापासून काहीसा दिलासा मिळेल अशी केंद्र सरकारची आशा होती. युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प-पुतिन चर्चेत अधिक प्रगती झाली, तर देशावरील ५० टक्क्यांपैकी २५ टक्के आयातशुल्क मागे घेतले जाण्याची शक्यता आहे असे सरकारला वाटते. निदान, २७ ऑगस्टला आणखी आयातशुल्क लादण्याची ट्रम्प यांनी धमकी दिली आहे, ती लांबणीवर पडू शकेल का असाही विचार केला जात आहे.