टोकियो/सोल : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आणि भारत-पाकिस्तानमध्ये मे महिन्यात झालेला संघर्ष आपणच थांबविला, या त्यांच्या दाव्याचा पुनरुच्चार केला. तसेच, संघर्षात सात नवी विमाने पडल्याचाही दावा त्यांनी केला.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखणे आणि कणखर आहेत. त्यांच्याबद्दल मला अपार आदर आहे,’ असे ट्रम्प म्हणाले. दक्षिण कोरियामध्ये ‘आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य’ (अॅपेक) देशांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. ट्रम्प यांचे दक्षिण कोरियात जपानमधून बुधवारी सकाळी आगमन झाले.
ट्रम्प म्हणाले, ‘मी पंतप्रधान मोदींना फोन केला. मी म्हणालो, ‘आम्ही तुमच्याबरोबर व्यापार करार करू शकत नाही….(ते म्हणाले) ‘नाही, नाही, आपण करार करायलाच हवा…’ मी म्हणालो,‘नाही, नाही करू शकत. तुम्ही पाकिस्तानबरोबर युद्ध सुरू केले आहे. आम्ही करार करणार नाही.’’
ट्रम्प यांनी पाकिस्तानचे फील्ड मार्शल आसीम मुनिर यांचीही स्तुती केली. ते म्हणाले, ‘त्यानंतर मी पाकिस्तानला फोन केला. मी म्हणालो, ‘तुम्ही भारताबरोबर लढत आहात. दोन्ही अण्वस्त्रसज्ज देश आहेत. आम्ही तुमच्याबरोबर व्यापार करणार नाही.’ त्यावर पाकिस्ताननेही ‘नाही, नाही…’ असे म्हटले.’
‘दोन्ही देशांच्या नेत्यांनी दोन दिवसांनी मला फोन केला आणि लढाई थांबविली,’ असा दावा त्यांनी केला. ‘बायडेन यांनी असे केले असते का,’ असेही ते म्हणाले.
सात नवी विमाने पडल्याचा दावा
तत्पूर्वी, जपानमध्ये त्यांनी भारत-पाकिस्तानमधील संघर्ष २४ तासांत थांबविल्याचा दावा केला. तसेच, या संघर्षात ‘सात नवी विमाने’ पडल्याचा दावाही त्यांनी केला. ‘दोन्ही देशांनी युद्धाचा आणि अमेरिकेशी व्यापाराचा काहीही संबंध नसल्याचे युक्तिवाद केला.
