चेन्नई : करुर येथे शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीवरून राज्यात तमिळनाडूमध्ये सत्ताधारी द्रमुक आणि ‘तमिळ वेत्री कळघम’ (टीव्हीके) यांच्यादरम्यान वाद वाढल्याचे मंगळवारी दिसले. राज्याचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आपल्याविरुद्ध सूड उगवत असल्याचा आरोप विजय यांनी केला. तसेच या प्रकरणी सत्य बाहेर येईल असा विश्वासही व्यक्त केला.
सरकारच्या अधिकृत प्रवक्त्या आणि आयएएस अधिकारी पी अमुता, आरोग्य सचिव सेंथिल कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) एस डेव्हिडसन देवासिरवाथम यांनी मंगळवारी सचिवालयात पत्रकार परिषद घेऊन सभेत नियमांचे उल्लंघन झाल्याचे दर्शवणाऱ्या अनेक ध्वनिचित्रफिती आणि छायाचित्रे दाखवली. ‘टीव्हीके’ने करुर येथे आयोजित केलेल्या सभेत कशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करण्यात आले, हे त्यामध्ये सांगण्यात आले. या सभेला अंदाजापेक्षा दुप्पट गर्दी जमली होती, त्यामुळे उपस्थितांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागले असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या पत्रकार परिषदेनंतर विजय यांनी एका ध्वनिचित्रफितीद्वारे आपल्या समर्थकांना संदेश दिला. “राज्य सरकारने आपल्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नये, त्यांना जी काही कारवाई करायची आहे, ती आपल्यावर करावी,” असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेसच्या शिष्टमंडळांनी करुरचा स्वतंत्र दौरा करून चेंगराचेंगरीतील पीडितांची भेट घेतली. रालोआच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व मथुराच्या खासदार हेमा मालिनी यांनी केले. अनुराग ठाकूर आणि तेजस्वी सूर्या यांचा शिष्टमंडळात समावेश होता. तर काँग्रेसच्या शिष्टमंडळात पक्षाचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल आणि इतर ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता. ही दुर्घटना कल्पनेच्या पलीकडील असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.