इंटरनेटचे (आंतरजालक)जाळे समुद्राखाली असू शकते, पण त्याचा वापर वैज्ञानिक आता  काही संवेदकांच्या मदतीने खोल सागरात होणाऱ्या भूकंपाचा अंदाज घेण्यासाठी व सुनामीची पूर्वसूचना मिळवण्यासाठी करीत आहेत.
खोल समुद्रात असलेले आंतरजालक म्हणजे इंटरनेट हे सुनामी, सागरी प्रदूषण या दोन्हींचा अंदाज देऊ शकते. बफेलो विद्यापीठातील सहायक प्राध्यापक टोमासो मेलोडिया यांनी सांगितले, की सागराखाली खोलवर असलेल्या इंटरनेट जाळय़ाची मदत आपण सागराच्या पृष्ठभागाखाली होत असलेल्या घडामोडी टिपण्यासाठी करू शकतो. स्मार्टफोन व संगणकावरही ही माहिती कुणालाही सहज उपलब्ध करून देता येईल व प्राणहानी टाळता येईल.
जमिनीवरून जाणारे आंतरजालक (इंटरनेट) हे रेडिओ लहरींवर चालते ते माहिती उपग्रह किंवा अँटेनामार्फत प्रक्षेपित करीत असते. दुर्दैवाने रेडिओ लहरी या पाण्याखाली प्रभावीपणे काम करू शकत नाहीत, त्यामुळे नेव्ही अँड नॅशनल ओशनिक अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या अमेरिकी संस्थेने पाण्याखाली संदेशवहनासाठी ध्वनिलहरींवर आधारित आंतरजालक यंत्रणा चालवण्यासाठी ध्वनिलहरींवर आधारित संदेशवहन तंत्र विकसित केले आहे. जगातील अनेक यंत्रणा हे तंत्र वापरतात, पण प्रत्येक यंत्रणेची पायाभूत सुविधा ही वेगळी असल्याने त्यांच्यात एकमेकांमध्ये माहितीची देवाणघेवाण कठीण असते. नवीन यंत्रणेत हा प्रश्न सोडवण्यात आला असून, पाण्याखालील संवेदक यंत्रणेच्या मार्फत माहितीची देवाणघेवाण केली जाईल. त्यामुळे ही माहिती लॅपटॉप, स्मार्टफोन व इतर वायरलेस उपकरणांमार्फत उपलब्ध होईल. मेलोडिया यांच्या मते खोल सागरातील आंतरजालक म्हणजे इंटरनेटमुळे अनेक प्रणाली एकत्र जोडून सुनामीचा अंदाज घेता येईल. अतिशय विश्वासार्ह अशी इशारावजा माहिती आपल्याला मिळू शकेल, त्यामुळे किनारी भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे सोपे जाईल. महासागराविषयीची माहितीही मिळेल. तेथील प्रदूषण किती आहे ते समजेल. लष्करी व कायदा अंमलबजावणी संदर्भातही या नवीन तंत्राचे काही उपयोग आहेत.
नेमकी चाचणी काय?
मेलोडिया यांनी या यंत्रणेची चाचणी बफेलो येथून जवळच असलेल्या एरी नावाच्या एका सरोवरात घेतली असून, त्यांचे सहकारी होवान्स कुलहागिजान व झाहिद हुसेन यांनी १८ किलो वजनाचे दोन संवेदक त्यासाठी पाण्यात सोडले होते. कुलहागिजान यांनी एक संदेश लॅपटॉपवर टाइप केला व काही सेकंदांत जवळच्या भिंतीमध्ये आवाजाच्या रूपात त्याचा प्रतिसाद मिळाला, त्यामुळे ही चाचणी यशस्वी झाली.