अमित शहा यांचे आवाहन; हिंसक आंदोलनावरून विरोधक लक्ष्य

नवी दिल्ली : ‘‘सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत विरोधक संभ्रम निर्माण करत आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘टुकडे-टुकडे गॅंग’ दिल्लीत अशांतता पसरवत असून, तिला अद्दल घडवा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दिल्लीतील जनतेला केले.

दिल्ली विकास प्राधिकरणाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना शहा यांनी काँग्रेससह विरोधकांवर टीकास्त्र सोडले. जामिया नगर आणि सीलमपूरमधील हिंसक आंदोलनाचे खापर शहा यांनी विरोधकांवर फोडले.

‘‘काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत (सीएए) जनतेची दिशाभूल केली. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत मांडले तेव्हा विरोधकांनी अपप्रचार सुरू केला. दिल्लीतील वातावरण बिघडविण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘टुकडे-टुकडे गँग’ कारणीभूत आहे. त्यांना अद्दल घडविण्याची वेळ आली आहे,’’ असे अमित शहा म्हणाले.

दिल्लीतील केजरीवाल सरकारची मुदत संपली असून आगामी निवडणुकीत भाजपची कामगिरी उंचावेल आणि पक्ष विजयी होईल, असा आशावाद शहा यांनी व्यक्त केला. ‘‘दिल्लीने लोकसभेच्या सातही जागा भाजपला दिल्या. आता दिल्लीच्या विकासासाठी येत्या निवडणुकीत भाजप उमेदवारांना आमदारपदी निवडून आणा,’’ असे आवाहन शहा यांनी केले.

केजरीवाल यांनी केंद्राच्या योजनांमध्ये अडथळे आणल्याचा आरोपही शहा यांनी केला. प्रधानमंत्री आवास योजना व आयुष्मान भारत यांची केजरीवाल यांनी अंमलबजावणी केली नाही. त्यांना फक्त त्यांचे नाव आमच्या प्रकल्पांवर लावायचे आहे, असेही शहा म्हणाले.