नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत ७ ते १० मे या कालावधीत झालेल्या लष्करी संघर्षादरम्यान पाकिस्तानने भारताविरुद्ध चीन आणि तुर्की देशांतील शस्त्रे आणि उपकरणांचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. आता जवळजवळ दोन आठवड्यांनी भारताने गुरुवारी दोन्ही देशांना भारत-पाकिस्तानमधील संघर्षाबाबत संवेदनशील राहण्यास बजावले आहे.
९ मे रोजी, पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न केला होता. या वेळी तेथील ढिगाऱ्यांच्या प्राथमिक तपासणीत पाकिस्तानने तुर्कीचे सोंगर सशस्त्र ड्रोन वापरले होेते. सोंगर ही एक सशस्त्र ड्रोन प्रणाली असून, जी ‘असिसगार्ड’ने आराखडीत आणि उत्पादित केली आहे. ही यंत्रणा कमी-तीव्रतेच्या संघर्षासाठी काम करते. ‘तुर्की सशस्त्र दला’द्वारे (टीएएफ) चालवली जाणारी ती पहिली देशांतर्गत सशस्त्र ड्रोन प्रणाली आहे.
१२ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारताने पाकिस्तानचे बहुतेक हवाई हल्ले परतवून लावले. यानंतर पहिल्यांदाच भारताने पाकिस्तानच्या शस्त्रागारात चीनने पुरवलेली शस्त्रे असल्याचा उल्लेख केला होता. ही शस्त्रे भारतीय सशस्त्र दलांविरुद्ध वापरली जात होती, असेही भारताने म्हटले होते.
दरम्यान, आम्हाला अपेक्षा आहे, की पाकिस्तानने सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे आणि गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी जोपासलेल्या दहशतवादी परिसंस्थेविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी आग्रही विनंती तुर्की त्यांना करेल. दोन्ही देशांमधील संबंध संवेदनशीलतेच्या आधारावर बांधले जातात, असे परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले.
‘आमचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि चीनचे परराष्ट्रमंत्री आणि सीमा प्रश्नावरील विशेष प्रतिनिधी वांग यी यांनी १० मे २०२५ रोजी एकमेकांशी चर्चा केली होती. तेव्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी पाकिस्तानमधून होणाऱ्या सीमापार दहशतवादाविरुद्ध भारताची दृढ भूमिका मांडली होती. त्यामुळे चीनला माहिती आहे की परस्पर विश्वास, परस्पर आदर आणि परस्पर संवेदनशीलता हा भारत-चीन संबंधांचा आधार आहे, असे जयस्वाल यांनी चीनला सुनावले आहे.
द्विपक्षीय सहमतीनेच भारतपाकिस्तान शस्त्रविराम
पाकिस्तानने विनवणी केल्यानंतरच भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रविरामावर समझोता झाल्याचे स्पष्टीकरण परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिले. ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप पूर्ण झालेले नाही. भविष्यात दहशतवादी हल्ले झाल्यास त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत पुन्हा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले करेल, असा इशाराही त्यांनी दिला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रविरामात मध्यस्थीची भूमिका बजावल्याचा दावा केल्यानंतर जयशंकर यांनी स्पष्टीकरण दिले.