सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास टर्कीमध्ये तब्बल ७.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के बसले. यामुळे टर्कीमध्ये हाहाकार उडाला असून आत्तापर्यंत ५०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांचा आकडा याहूनही अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहाटे पहिला धक्का बसल्यानंतरही काही अंतराने कमी तीव्रतेचे धक्के बसल्यामुळे नुकसानाचा एकूण आकडा मोठा असल्याचं सांगितलं जात आहे. जगभरातून या भीषण नैसर्गिक आपत्तीवर शोक व्यक्त केला जात असतानाच एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टर्कीमध्ये मोठी जीवितहानी घडवून आणणाऱ्या भूकंपाबाबत तीन दिवस आधीच एका संशोधकानं इशारा दिला होता, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. या संशोधकानं आपल्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भात इशारा दिला होता. आता हे ट्वीट व्हायरल होत असून त्यावर मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. तसेच, भूगर्भ शास्त्रज्ञ किंवा भूगर्भशास्त्र विभागाकडून देण्यात येत असलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं गंभीर ठरू शकतं, अशी प्रतिक्रियाही यासंदर्भात व्यक्त केली जात आहे.

Frank Hoogerbeets चं ‘ते’ ट्वीट व्हायरल!

ssgeos या संस्थेमध्ये काम करत असलेले संशोधक फ्रँक हूगरबीट्स यांनी ३ फेब्रुवारी रोजीच या भूकंपाच्या धक्क्याविषयी कल्पना दिली होती. त्यांच्या ट्वीटमध्ये त्यांनी व्यक्त केलेल्या भूकंपाच्या तीव्रतेचा आकडाही जवळपास तंतोतंत खरा ठरल्यामुळे या ट्वीटची चर्चा होऊ लागली आहे. “नजीकच्या काळात दक्षिण-मध्य टर्की, जॉर्डन, सिरिया, लेबेनॉन या भागात ७.५ रिश्टर स्केल इतक्या भूकंपाचा तीव्र धक्का बसणार आहे”, असं या ट्वीटमध्ये फ्रँक हूगरबीट्स यांनी म्हटलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटसोबत भूकंपाचा केंद्रबिंदू दाखवणारा मॅपही शेअर केला होता.

कुठे झाला भूकंप?

हूगरबीट्स यांनी सांगितल्याप्रमाणे, तुर्कस्तानमधल्या गाझियांटेप शहराजवळ नूर्दगी शहरापासून २६ किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. युनायटेड जिओलॉजिकल सर्वेनं दिलेल्या माहितीनुसार, भूपृष्ठापासून जवळपास १४.१ किलोमीटर खाली या भूकंपाचं केंद्र आहे. या तीव्र धक्क्यामुळे तुर्कस्तानप्रमाणेच सिरियातही मोठं नुकसान झालं आहे. अलेप्पो आणि हमा या शहरांमधल्या अनेक इमारती कोसळल्या आहेत. बचाव पथकांनी मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू केलं असून इमारतींच्या मलब्याखाली दबलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम चालू आहे.

Turkey Earthquake : भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरियामध्ये प्रचंड विध्वंस, मृतांची संख्या ५५० च्या पुढे

तुर्कस्तानमधील या भीषण नैसर्गिक आपत्तीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, टर्कीला शक्य ती सर्व मदत करण्याचा शब्दही मोदींनी ट्वीटद्वारे दिला आहे. “टर्कीमध्ये भूकंपामुळे झालेली जीवितहानी आणि वित्तहानीमुळे दु:ख झालं आहे. आपल्या नातेवाईकांना गमावलेल्या व्यक्तींच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच प्रार्थना. या नैसर्गिक आपत्तीमध्ये भारत टर्कीच्या नागरिकांच्या पाठिशी ठामपणे उभा आहे. शक्य ती सर्व मदत देण्यासाठी आम्ही तयार आहोत”, असं मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Turkey earthquake update news frank hoogerbeets tweet viral pmw
First published on: 06-02-2023 at 13:46 IST