JMB Members Arrested in Bengal : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ताणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कता बाळगली जात आहे. यादरम्यान ८ आणि ९ मे च्या मध्यरात्री पश्चिम बंगालमधील स्पेशल टास्क फोर्सच्या पथकाने बिरभूमी जिल्ह्यातील नलहाटी आणि मुराराई येथे छापेमारी केली. या छापेमारीत अजमोल हुसेन (२८) रा. नलहाटी आणि साहेब अली खान (२८) रा. मुराराई या दोघांना अटक करण्यात आली आहे.

अधिकार्‍यांनी केलेल्या दाव्यानुसार, हे दोघे जमातुल मुजाहिदीन बांग्लादेश (JBM) विचारांचा प्रचार करताना आढळून आले आहेत. ही दहशतवादी संघटना असून यावर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेले दोघेही एका मॉड्यूलचा भाग आहेत जे मॉड्यूल अत्याधुनिक पद्धतींचा वापर करून देशविरोधी आणि जिहादी साहित्याचा प्रसार करत आहे. भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडतेला हानी पोहचवण्यासाठी काही विशिष्ट व्यक्ती आणि ठिकाणांना लक्ष्य करण्याची योजना आखल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.

तसेच ते मुस्लिम तरूणांची भरती आणि त्यांना दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी तसेच भारत सरकारविरोधात युद्ध सुरू करण्याच्या दृष्टीने प्रवृत्त करण्याच्या कामात गुंतले होते, अशा माहिती पोलिसांनी दिली आहे. हुसेनने यापूर्वी जिहादी कारवायांच्या संदर्भात बांगलादेशात घुसखोरीचा प्रयत्न केला होता, असेही पोलिसांनी सांगितले.

या दोघांनी इतर सहकाऱ्यांबरोबर मिळून ‘गजवतुल हिंद’ च्या विचारसरणीचा प्रसार आणि अनुसरण करण्यासाठी बंदुका मिळवण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर स्फोटके तयार करण्याची योजना देखील आखली, असे एसटीएफने म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन्ही आरोपींना शुक्रवारी बीरभूममधील रामपूरहाट येथे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी (एसीजेएम) यांच्या न्यायालयात हजर केले जाईल आणि सविस्तर चौकशी करण्यासाठी आणि मॉड्यूलचे इतर घटक शोधण्यासाठी पोलिस कोठडीची विनंती केली जाईल, असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.