लोकसभा निकालावर एक लाख रुपयांची पैज लावणाऱ्या दोन जणांविरुद्ध सांगली पोलिसांनी गुन्हा दाखल करत रविवारी अटक केली. जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये संजय पाटील जिंकणार की विशाल पाटील विजयी होणार? यावरून दोघा समर्थकांनी एक लाख रुपयांची पैज लावली होती. याप्रकरणी भाजपाकडून पज लावणारे राजकुमार लहू कोरे व स्वाभिमानीकडून पैज लावणारे रणजित लालासाहेब देसाई या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या पैजेसाठी १०० रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर नोटरीही करून घेतली आहे. या पैजेच्या रकमेचे धनादेशही तयार करण्यात आले. त्याचे छायाचित्र समाजमाध्यमातून प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.