राजस्थानमधील धौतपूर जिल्ह्यात एक थरारक अशी घटना समोर आली आहे. येथे महिलेचे एका व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध होते. याच कारणातून महिलेच्या भावांनी तिचा खून केला आहे. ही घटना समोर आल्यावर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या दोन भावांसह त्यांच्या सहकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

अनिता धर्मवीर प्रजापति ( ३५ वर्षे ) असं मृत महिलेचं नाव आहे. तर, लोकेश सिंह, राजू सिंह आणि विकास खटीक असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा : काळ्या जादूच्या संशयावरून मुलाने केली वडिलांची हेरगिरी, तर पकडले गेले लैंगिक अत्याचार करताना

२३ जूनला एक महिलेचा मृतदेह पायाला दोरी बांधलेल्या अवस्थेत धौलपूर जिल्ह्यातील निभी येथील तलावात तरंगताना आढळून आला. यानंतर तिचा मृतदेह सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवला होता. २४ जूनला महिलेचा भावजी लखन कुमार याने मृतदेहाची ओळख पटवली.

याप्रकरणी लखन कुमार याने आग्रा येथे वहिणीच्या खूनाचा गुन्हा दाखल केला. त्यात लखन कुमारने सांगितलं की, गेल्या तीन वर्षापासून भाऊ धर्मवीर मानसिक स्वरूपातील आजाराशी सामना करतोय. यादरम्यान आमच्या इमारतीत भाड्याने राहत असलेल्या रतन सिंह नावाचा व्यक्ती राहत होता. त्याच्याशी वहिणीचे अनैतिक संबंध जुळले. यावर वहिणीच्या कुटुंबीयांचा देखील आक्षेप होता.

त्यातच २२ जूनला लोकेश, राजू आणि विकास अनिताला माहेरी घेऊन जाण्यासाठी येतात. पण, दोघे भाऊ आणि त्यांचा सहकारी अनिताला धौलपूर जिल्ह्यातील बाडी उपखंड येथील निभी तलावाजवळ घेऊन गेले. तिथे तिघांनी अनिताचे पाय बांधले आणि तिला पाण्यात तीनवेळा बुडवलं. यात अनिताचा मृत्यू झाला. यानंतर मृतदेहाला तलावातच फेकून आरोपी फरार झाले.

हेही वाचा : हातातून निसटला पाळीव कुत्र्याचा पट्टा अन् शेजाऱ्यांनी मालकिणीलाच केली मारहाण…

याप्रकरणी बसई डांग येथील पोलीस अधिकारी मोहन सिंह म्हणाले, आरोपींच्याविरोधात कलम ३०२ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चौकशीदरम्यान मृत महिलेचा भाऊ २६ वर्षीय लवकुश उर्फ लोकेश, ४० वर्षीय राजू सिंह आणि २५ वर्षीय विकास खटीकला आग्रा येथून अटक केली आहे.