two brothers in Himachal pradesh marry same woman : देशात लग्न सोहळ्याच्या अनेक वेगवेगळ्या परंपरा आपल्याला पाहायला मिळतात. सध्या हिमाचल प्रदेशमधी एक लग्न विशेष चर्चेत आले आहे आणि त्यासाठी कारण देखील तसेच आहे. हिमाचल प्रदेशमदील शिल्लाई गावातील एक महिलेशी हट्टी जामातीच्या दोन भावांनी एकदाच लग्न केले आहे. शेकडो लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. सध्या कालबाह्य झालेल्या पॉलीएंड्री (Polyandry) म्हणजे एकाच वेळी एकापेक्षा जास्त पती असण्याच्या प्रथेनुसार हे लग्न लावण्यात आले. दरम्यान वधू सुनिता चौहान आणि वर प्रदीप आणि कपिल नेगी यांनी यावेली स्पष्ट केले की त्यांनी हा लग्नाचा निर्णय कोणत्याही दबावाखाली घेतलेला नाही.

सिरमौर जिल्ह्यातील ट्रान्स-गिरी भागातील या लग्नसोहळ्यात स्थनिक लोकगीते आणि नृत्य सादर करण्यात आली. १२ जुलै रोजी सुरू झालेला हा सोहळा पुढील तीन दिवस हा सुरू होता. दरम्यान या लग्न समारंभाचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

विशेष म्हणजे हिमाचल प्रदेशच्या महसूल कायद्याने या परंपरेला मान्यता दिलेली आहे आणि याला ‘जोडीदरा’ असे नाव देण्यात आले आहे. ट्रान्स-गिरी भागातील बधाना गावात गेल्या सहा वर्षात अशा प्रकारचे पाच विवाह झाले आहेत.

कुन्हात गावातील रहिवासी असलेल्या सुनिताने सांगितले की तिला या प्रथेबद्दल माहिती होती आणि तिने कुठल्याही दबावाशिवाय याचा निर्णय घेतला, तसेच आपण या नात्याचा आदर करतो असेही तिने सांगितले.

एक सरकारी नोकरदार तर दुसरा परदेशात

प्रदीप हा शिल्लई गावातील असून तो एका सरकारी विभागात नोकरी करतो आणि त्याचा लहान भाऊ कपिल हा परदेशात नोकरी करतो.

“आम्ही सार्वजनिकरित्या या परंपरेचे अनुसरण केले कारण आम्ही याचा अभिमान बाळगतो आणि हा आमचा एकत्रित निर्णय होता,” असे प्रदीप याने सांगितले.

या लग्नाबाबत कपिल म्हणाला की जरी तो परदेशात राहत असेल तरी या लग्नाच्या माध्यमातून, “आम्ही आमच्या पत्नीला एक संयुक्त कुटुंब म्हणून आधार, स्थिरता आणि प्रेम मिळेल याची काळजी घेत आहोत. आमचा कायम पारदर्सकतेवर विश्वास राहिला आहे.”

हट्टी हा हिमाचल प्रदेश-उत्तराखंड सीमेजवळील एक समुदाय आहे, या समुदायाला तीन वर्षांपूर्वी अनुसूचित जमाती म्हणून घोषित करण्यात आले आहे. या जमातीमध्ये बहुपतित्वाची प्रथा अनेक शतकांपासून प्रचलित आहे. पण महिलांमध्ये वाढती साक्षरता आणि या भागाती आर्थिक पातळीवर झालेली प्रगती यामुळे बहुपतित्वाची प्रकारणे कमी झाली आहेत.

गावातील ज्येष्ठांनी दिलेल्या माहितीनुसार, असे लग्न गुप्त समारंभात केले जातात आणि समाजाकडून स्वीकारले जातात पण अशा घटना खूप कमी घडतात.

तज्ज्ञांच्या मते, परंपरेमागील एक मुख्य विचार म्हणजे वडिलोपार्जित जमिनीचे विभाजन होणार नाही याची काळजी घेणे हे आहे. येथे वडिलोपार्जित संपत्तीमध्ये महिलांचा वाटा ही एक प्रमुख समस्या आहे.