केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष अमित शहा व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व्यासपीठावर. राजनाथ सिंह यांचे भाषण रंगात आलेले. महत्त्वाच्या मुद्दय़ावर ते बोलत असतात. श्रोत्यांमध्ये केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल, विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन. अशा रंगलेल्या कार्यक्रमात वीज गायब होते. एकदा नव्हे तर दोनदा! उपस्थितांमध्ये चर्चा सुरू होते- महाराष्ट्र सदनात कार्यक्रम असल्यावर हे होणारच!सन २०१२ साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत झालेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात वीज गेली होती. त्याची आठवण पुन्हा एकदा महाराष्ट्र सदनातील व्यवस्थापनाने करून दिली. नितीन गडकरी यांच्या ‘भविष्य का भारत’ या हिंदी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात महाराष्ट्र सदनातील ढिसाळ नियोजन चव्हाटय़ावर आले. कधी माईक बंद तर कधी दिवे बंद! अशात मग राजनाथ सिंह यांची टिप्पणी- हम (भाजप) अंधेरेमे तीर चलाना जानते है! हीच संधी घेत ऊर्जामंत्र्यांनी लगेचच दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार असल्याची कोटी केली. कशीबशी वीज आली. कार्यक्रम सुरू झाला.
‘पूलकरी’ असा उल्लेख करून भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष असतानाच्या आठवणींना उजाळा दिला. आजूबाजूला नेहमी कार्यकर्त्यांचा गराडा; सर्वाशी बोलणे व रात्री उशिरापर्यंत कुणालाही सहजपणे भेटणाऱ्या गडकरींचे किस्से त्यांनी सांगितले. असे तर मलादेखील अध्यक्ष असून करणे जमत नाही, असे मोकळेपणाने शहा यांनी मान्य केले. जाता-जाता नितीन गडकरी यांना अध्यक्ष बनविल्याने भाजपमध्ये एका पिढीचे परिवर्तन झाले; नव्हे तर ही पिढी सर्वानी स्वीकारली- असे सूचक वक्तव्य करून स्वपक्षातील वाजपेयी-अडवाणी पर्व संपल्याची जाणीव शहा यांनी करून दिली. गरीब, समस्येची जाणीव असलेल्यांना धोरण ठरविण्यात आतापर्यंत सहभाग नसल्याने समस्यांची तीव्रता वाढल्याची भावना शहा यांनी व्यक्त केली.राजनाथ सिंह म्हणाले की, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे संकल्पक नितीन गडकरी आहेत. वाजपेयी पंतप्रधान असताना या विषयावर चर्चा करण्यासाठी त्यांना बोलावून घेत असत. भारतीय विकासाचे प्रारूप स्वदेशी असायला हवे. त्यासाठी महात्मा गांधी, पं. दीनदयाल उपाध्याय, राममनोहर लोहिया यांचे विचार तारक ठरतील, अशी भावना त्यांनी व्यक्तकेली.मनोगतात गडकरी यांनी स्वत: केलेल्या विविध सामाजिक प्रयोगांची माहिती दिली.
संग्रहित लेख, दिनांक 16th Aug 2015 रोजी प्रकाशित
गृहमंत्र्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात दोनदा वीज गायब!
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष अमित शहा व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व्यासपीठावर. राजनाथ सिंह यांचे भाषण रंगात आलेले.
First published on: 16-08-2015 at 12:38 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two time electricity gone during in home minister speech