रस्त्याच्या बांधकामाला विरोध केला म्हणून दोन महिलांना मुरुमाच्या ढिगाऱ्याखाली गाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील मनगावा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुरूम टाकण्यासाठी वापरण्यात आलेला ट्रक आणि बुलडोजरदेखील जप्त करण्यात आला आहे. या घटनेनंतर काँग्रेसनेही भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील हिनोता जरोत गावात रस्त्याचे बांधकाम सुरू होतं. मात्र, या रस्त्याच्या बांधकामाला गावातील दोन महिलांनी विरोध करत हा रस्ता आमच्या खासगी जागेवर बांधण्यात येत असल्याचा आरोप केला. त्यामुळे संतप्त झालेल्या कंत्राटदाराने थेट महिलांच्या अंगावर मुरूम टाकत त्यांना ढिगाऱ्याखाली गाडण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा – बाईकवर स्टंट करणं जीवावर बेतलं! रील काढण्याच्या नादात तरुणाचा मृत्यू

दरम्यान, काही वेळानंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. तसेच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत या महिलांना बाहेर काढले. तसेच त्यांना रुग्णालयात दाखल केले. यासंदर्भात बोलताना, पोलीस अधिकारी म्हणाले, याप्रकरणी आम्ही दोघांना ताब्यात घेतलं आहे. तसेच ट्रक आणि बुलडोजर जप्त करण्यात आला आहे. तसेच प्राथमिक तपासानुसार हे प्रकरण घरगुती वादातून घडलं असून याला राजकीय किनारदेखील आहे, अशी माहितीही पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या घटनेनंतर काँग्रेसनेही मध्य प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली आहे. मध्य प्रदेशच्या रीवामधून मानवतेला काळीमा फासणारी घटना पुढे आली आहे. येथे जमिनीच्या वादातून काही गुंडांनी दोन महिलांना जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना म्हणजे मध्य प्रदेशच्या बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचा पुरावा आहे. महिला सुरक्षा आणि त्यांच्या सक्षमीकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्व दावे पोकळ असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. देशात महिलांवरील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून नरेंद्र मोदी नेहमीप्रमाणेच मौन बाळगून आहेत, असे काँग्रेसने म्हटलं आहे.