Donald Trump : युनायटेड स्टेट्‍सच्या कंझ्युमर फायनान्शिअल प्रोटेक्शन ब्युरोचे (CFPB) प्रमुख रोहित चोप्रा यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं आहे. रोहित चोप्रा यांची अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाकडून ग्राहक आर्थिक संरक्षण ब्युरो (CFPB) चे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. मात्र, आता अमेरिकेची सूत्रे पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी रोहित चोप्रा यांना संचालक पदावरून हटवलं आहे.

अमेरिकेच्या ग्राहक आर्थिक संरक्षण ब्युरोचे संचालक म्हणून रोहित चोप्रा यांचा कार्यकाळ २०२६ पर्यंत होता. मात्र, त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी रोहित चोप्रा यांना पदावरून हटवलं आहे. रोहित चोप्रा हे २०२१ पासून ग्राहक आर्थिक संरक्षण ब्युरोचे संचालक म्हणून कार्यभार पाहत होते. आता रोहित चोप्रा यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर रोहित चोप्रा यांनी त्यांच्या कार्यकाळाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

तसेच वित्तीय संस्थांना जबाबदार धरण्यासाठी आणि ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी एजन्सीच्या प्रयत्नांवर भाष्य केलं. खरं तर रोहित चोप्रा यांना ग्राहक संरक्षण कायद्यांची अंमलबजावणी आणि विस्तार करण्यासाठी ओळखलं जातं होतं. मात्र, असं असतानाही रोहित चोप्रा यांना ग्राहक आर्थिक संरक्षण ब्युरोचे संचालक पदावरून हटवल्यामुळे मोठी चर्चा रंगली आहे.

दरम्यान, रोहित चोप्रा यांनी यासंदर्भातील पत्र त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे. त्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की, जेव्हा खूप जास्त शक्ती काहींच्या हातात केंद्रित झाली, तेव्हा सीएफपीबी सारख्या एजन्सी अधिक महत्त्वाच्या झाल्या आहेत. सीएफपीबी निर्मिती २०११ मध्ये झाली होती. त्यावर राजकारणाचा प्रभाव नसावा अशा पद्धतीने स्थापना करण्यात आली होती. मात्र, पुढे चालून राजकीय बदलांमुळे सीएफपीबीच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोणतेही कारण न देता या सीएफपीबीच्या प्रमुखांना पदावरून काढून टाकू शकतात, असा निर्णय २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रोहित चोप्राच्या कामामुळे वॉल स्ट्रीटला खूप त्रास झाला. ग्राहकांचे हित जपण्यासाठी त्यांनी कठोर पावले उचलली होती. त्यांनी बँकांकडून ओव्हरड्राफ्ट शुल्क कमी करण्यास सांगितले होते. याशिवाय त्यांनी वेल्स फार्गो बँकेला २०२२ मध्ये ग्राहकांच्या झालेल्या नुकसानीसाठी दोन अब्ज डॉलर्सची परतफेड करण्याचे आदेश दिले होते. रोहित चोप्रा हे त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळेही कायम चर्चेत असायचे.