अमेरिकेतील पहिल्या महिला वृत्तनिवेदक बार्बारा वॉल्टर्स या पुढील वर्षी निवृत्त होत आहेत. १९७६ मध्ये त्यांनी वृत्तनिवेदनात कारकीर्द सुरू केली होती. वॉल्टर्स यांनी १९६१ मध्ये दूरचित्रवाणी पत्रकारितेत कारकीर्द सुरू केली. सुरूवातीला त्यांनी एनबीसीच्या ‘द टुडे शो’ कार्यक्रमात काम केले.
 त्यानंतर पाच वर्षांनी त्यांनी एबीसीमध्ये इव्हिनिंग न्यूजमध्ये काम सुरू केले. त्या काळात त्या पहिल्याच महिला वृत्तनिवेदक होत्या, अलीकडच्या काळात त्यांनी १९९७ मध्ये ‘द व्हयू’ नावाचा अनौपचारिक चर्चा कार्यक्रम सादर केला होता. त्या दिवसातील प्रश्नांवर महिलांच्या पॅनेलने चर्चा करायची असे त्याचे स्वरूप होते व अमेरिकेतील अध्यक्षीय उमेदवार हा कार्यक्रम आवर्जून बघत असत. मी तयार केलेला द व्ह्य़ू हा कार्यक्रम माझी कारकीर्द संपूनही चालू राहत आहे यात आनंदच आहे, असे वॉल्टर्स यांनी एबीसीच्या वेबसाइटवर म्हटले आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी क्युबाचे नेते फिडेल कॅस्ट्रो, इजिप्तचे अन्वर सादत, इस्रायलचे नेते मेनाकेम बेगिन व रीचर्ड निक्सन पासून अमेरिकेचा प्रत्येक अध्यक्ष व त्यांच्या पत्नी यांच्या मुलाखती घेतल्या होत्या.