टॅक्सीची सेवा पुरविणाऱ्या उबेर कंपनीच्या एका उपकंपनीने चालकविरहीत ट्रकची निर्मिती केली आहे. ट्रकची केवळ निर्मिती करण्यात आली नसून, या स्वयंचलित ट्रकने काम करण्यासदेखील सुरुवात केली आहे. या ट्रकने मंगळवारी पहिली मालवाहतूक केल्याची माहिती ट्रकची निर्मिती करणाऱ्या Otto कंपनीने दिली. ट्रकमध्ये सेल्फ ड्रायव्हिंग तंत्राचा वापर करण्यात आला आहे. या ट्रकमधून अमेरिकेतील कोलोराडो येथे बिअरची डिलिव्हरी करण्यात आली. स्वयंचलित ट्रकने सुरक्षितपणे ही डिलिव्हरी पार पाडली. १८ चाकं असलेल्या या ट्रकने वर्दळीच्या रस्त्यावरून मार्ग काढत १९३ किलोमीटर अंतर दोन तासांत पार केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रवासादरम्यान एक तंत्रज्ञ ट्रकमध्ये उपस्थित होता. तो चालकाच्या सीटवर न बसता मागील बर्थवर बसून केवळ ट्रकच्या हालचालींवर नजर ठेऊन होता. कॅमेरा, रडार आणि सेंसरचा वापर करत रस्त्यावरून धावणारा ट्रक या माध्यमातूनच त्याच्या पुढील आणि मागील गाड्यांमधील आंतराविषयी माहिती मिळवत होता. दोन तासांचा प्रवास करणारा हा ट्रक हायवेवर चालकाविना धावला, तर अतिशय वर्दळीच्या आणि गुंतागुंतीच्या ठिकाणी ट्रकमध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तीने ट्रक चालवला.

सध्या स्वयंचलित कार आणि ट्रकच्या क्षेत्रात फार मोठ्याप्रमाणावर विकास होताना दिसत आहे. गूगल, टेस्ला मोटर्स, जीएम आणि फोर्डसारख्या कंपन्या या क्षेत्रात सातत्याने काम करत आहेत. ऑन डिमांड कार सेवा पुरविणारी उबेर कंपनीदेखील यात मागे राहिलेली नाही. उबेरने ऑगस्ट महिन्यात स्वीडनमधील कार निर्मिती करणारी कंपनी वोल्वोसोबत ३० कोटी डॉलर्सचा करार केला. याअंतर्गत २०२१ पर्यंत पूर्णपणे चारकविरहीत कारची निर्मिती करण्यात येईल. याव्यतिरिक्त सॅनफ्रॅन्सिस्कोमधील ओट्टो या स्टार्टअप कंपनीचे अधिग्रहणदेखील उबेरने केले आहे. ओट्टोनेचा या स्वयंचलीत ट्रकची निर्मिती केली आहे.

व्हिडिओ :

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ubers self driving truck makes first delivery
First published on: 26-10-2016 at 13:50 IST