इराक आणि अफगाणिस्तान युद्धांशी संबंधित गुप्त फाईल्स प्रकाशित केल्याबद्दलच्या खटल्याला सामोरे जाण्यासाठी ब्रिटनच्या न्यायालयाने बुधवारी विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजला अमेरिकेच्या ताब्यात देण्याचा औपचारिक आदेश जारी केला. आता हा निर्णय गृहमंत्री प्रिती पटेल यांच्यावर अवलंबून आहे. तथापि, प्रत्यार्पणाला मान्यता दिल्यास असांजचे वकील उच्च न्यायालयात १४ दिवसांच्या आत अपील करू शकतात.

मध्य लंडनमधील न्यायदंडाधिकार्‍यांचा आजचा (बुधवार) निर्णय ब्रिटन न्यायालयांमध्ये दीर्घकाळ चालत असलेल्या कायदेशीर प्रक्रियेला निष्कर्षाजवळ पोहोचवणार आहे. परंतु असांजच्या वकिलांनी पटेल यांच्याकडे अर्ज दाखल करण्याचा आणि खटल्यातील इतर मुद्द्यांवर संभाव्य अपील करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचे वकील, बर्नबर्ग पीयर्स सॉलिसिटर यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते की, “त्यांच्याकडून यापूर्वी उपस्थित केलेल्या इतर महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत त्यांनी उच्च न्यायालयात आतापर्यंत कोणतेही अपील दाखल केलेले नाही.” अपीलाची ती वेगळी प्रक्रिया अर्थातच अद्याप सुरू व्हायची आहे.

असांजला गेल्या महिन्यात यूकेच्या सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. तेथे त्याला तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागू शकते. इराक आणि अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या नेतृत्वाखालील युद्धांशी संबंधित 500,000 गुप्त लष्करी फाइल्सच्या प्रकाशनाच्या संदर्भात वॉशिंग्टनला त्याच्यावर खटला चालवायचा आहे.