भारतीय बँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून पसार झालेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर ब्रिटनच्या न्यायाधीशांनी चिंता व्यक्त केली आहे. प्रत्यार्पणाच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी आर्थर रोड कारागृहातील बराक क्रमांक १२ मध्ये नैसर्गिक उजेड आणि वैद्यकीय सुविधेवरुन चिंता व्यक्त केली. विजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण केल्यास त्याला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, न्यायाधीशांनी विजय मल्ल्याला कर्ज देताना भारतीय बँकांनी नियम मोडले असल्याचं स्पष्ट आहे असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.

विजय मल्ल्याला भारतात आणल्यानंतर आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे अशी माहिती आहे. काही महिन्यांपुर्वी आर्थर रोड कारागृहाची नेमकी काय परिस्थिती आहे, कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची माहिती केंद्र सरकारने लंडन कोर्टमध्ये दिली होती. विजय मल्ल्याची आर्थर रोड कारागृहात रवानगी झाल्यास बराक क्रमांक 12 मध्ये ठेवण्यात येणार आहे. याच ठिकाणी मुंबई 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आलं होतं. आर्थर रोड कारागृहात मल्ल्याच्या सुरक्षेची सर्व व्यवस्था उपलब्ध आहे अशी माहिती केंद्र सरकारने आपल्या रिपोर्टमध्ये दिली होती. 1925 रोजी बांधकाम करण्यात आलेल्या आर्थर रोड कारागृहाची 804 कैद्यांची क्षमता आहे. मात्र सध्या तिथे 2500 कैद्यांना ठेवण्यात आलं आहे.

९ हजार कोटींचा चुना लावून पळालेला मद्य सम्राट विजय मल्ल्या याच्या किंगफिशर एअरलाइन्सला कर्ज देण्यासाठी भारतीय बँकांनी नियम मोडले हे डोळे बंद केले तरीही समजते. ही प्रतिक्रिया आहे लंडनच्या वेस्टमिनिस्टर्स मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या जज एमा आर्बथनॉट यांची. विजय मल्ल्याचे कर्ज बुडवण्याचे प्रकरण एखाद्या ‘जिगसॉ पझल’ प्रमाणे गुंतागुंतीचे आहे. जिगसॉ पझलमध्ये जसे तुकडे जोडले जातात आणि ते पूर्ण केले जाते अगदी तसेच या प्रकरणातही अनेक पुरावे एकमेकांशी जोडावे लागणार आहेत असेही आर्बथनॉट यांनी म्हटले आहे.

मागील काही महिन्यांच्या तुलनेत आता हे देखील स्पष्ट झाले आहे की विजय मल्ल्याला कर्ज देताना बँकांनी आपलेच नियम पायदळी तुडवले. कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या प्रकरणाची सुनावणी लंडनच्या वेस्ट मिनिस्टर्स कोर्टात सुरु आहे. शुक्रवारी यासंदर्भात जज एमा आर्बथनॉट यांनी भारतीय बँकांचे आणि त्याचसोबत विजय मल्ल्याचे आपल्या शब्दांनी अक्षरशः कान टोचले

2 मार्च २०१७ला विजय मल्ल्या दुपारी 1.30 वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली – लंडन ‘9W 122’ विमानाने रवाना झाला होता. विजय मल्ल्याला देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती, मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती..