युनायटेड किंगडम मधून बाहेर पडायचे किंवा कसे याबाबत स्कॉटलंडमध्ये होणारे सार्वमत अवघ्या ११ दिवसांवर आले आहे. त्यातच जनमत चाचण्यांनी स्वातंत्र्याचे समर्थन करणाऱ्यांनाच या सार्वमतात विजयश्री मिळेल, असे भाकीत वर्तवले आहे.
    मात्र यामुळे खडबडून जागे झालेल्या युनायटेड किंगडमने स्कॉटलंडने बाहेर पडू नये यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. स्कॉटलंडला अधिक स्वायत्तता देण्याची हमी देऊ करण्यात आली आहे. दरम्यान, स्कॉटलंडच्या स्वातंत्र्याबाबत ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांनी चिंता व्यक्त केली आहे.
ब्रिटनच्या गोटात अस्वस्थता
स्कॉटलंड आणि ब्रिटन गेली ३०० वर्षे एकत्र आहेत. येत्या १८ सप्टेंबर रोजी स्कॉटलंडमध्ये स्वातंत्र्याबाबत सार्वमत घेण्यात येणार आहे. मात्र त्याआधी घेण्यात आलेल्या जनमत चाचण्यांमध्ये स्कॉटलंड युनायटेड किंगडममधून बाहेर पडेल आणि स्वातंत्र्यवाद्यांनाच बहुमत मिळेल, असे अंदाज वर्तविण्यात आले. त्यामुळे ब्रिटनच्या गोटात अस्वस्थता पसरली असून कररचना आणि वित्तीय खर्च यांच्याबाबत स्कॉटलंडला अधिक स्वायत्तता लवकरच देण्यात येईल, असे ब्रिटनचे अर्थमंत्री जॉर्ज ओसबॉर्न यांनी स्पष्ट केले.
स्कॉटिश नॅशनल पक्ष आक्रमक
स्कॉटिश नॅशनल पक्षाने आक्रमक भूमिका धारण केली असून ज्यांच्या मनांत स्वातंत्र्याविषयी संदेह असेल अशांनी मतदानात भाग घेण्यापेक्षा घरी बसणे पसंत करावे, मात्र स्वातंत्र्याच्या विरोधात मतदान करणे टाळावे, असे आवाहन स्कॉटलंडचे नेते अलेक्स सालमंड यांनी केले आहे. स्कॉटलंडने ब्रिटनचा एकतृतीयांश भाग व्यापला असून ब्रिटनच्या अण्वस्त्रविरोधी नाविक तळाचे ते मुख्य केंद्र आहे.