UK Political Crisis News ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) आज राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या २४ तासात पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून बंडखोरी करत ४० पेक्षा जास्त मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. परिणामी बोरिस जॉन्सन यांचे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील पंतप्रधानांची घोषणा होईपर्यंत जॉन्सन पदभार सांभाळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रासारखेच ब्रिटनमध्येही राजकीय संकट
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात आलेल्या राजकीय संकटाप्रमाणेच ब्रिटनमध्येही राजकीय संकट ओढवल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात शिवसेनेच्या ३९ आमदांरांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. परिणामी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्याचप्रमाणे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधील ४० पेक्षा जास्त मंत्र्यांनी बंडखोरी करत राजीनामा दिला आहे. तसेच जॉन्सन यांच्यावर विश्वास नसल्याचाही आरोप या मंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांच्या पंतप्रधानपदाच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे.

हेही वाचा- विश्लेषण : ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन कोणत्या नवीन वादात सापडले? त्यांचे पद टिकणार का?

अर्थमंत्री, गृहमंत्र्यांचा राजीनामा
ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी सर्वप्रथम ५ जुलै रोजी आपला राजीनामा दिला होता. त्यानंतर आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. महत्त्वाची बाब म्हणजे बोरिस जॉन्सन यांच्या कट्टर समर्थक समजल्या जाणाऱ्या गृहमंत्री प्रिती पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये जवळजवळ ४० पेक्षा जास्त मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्रिटनच्या अर्थमंत्री पदी नदिम जहावी यांची नियुक्ती
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मंगळवारी ऋषी सुनक यांच्या जागी नदिम जाहवी यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी मंगळवारी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावरील विश्वास गमावल्याचे सांगत आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. अर्थमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर नदिम जाहवी यांनी ट्वीट कत बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे.