Manchester Synagogue Attack : उत्तर इंग्लंडमध्ये एका ज्यू धर्मियांचे प्रार्थनास्थळ म्हणजेच सिनगॉगच्या (Synagogue) बाहेर कारने धडक दिल्याच्या आणि चाकूने हल्ला केल्याच्या घटनेत किमान दोन लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात इतर तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी यासंबंधी माहिती दिली आहे.

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, ज्यू धर्मीयांचा वर्षातील सर्वात पवित्र दिवस असलेल्या योम किप्पूर (Yom Kippur) या दिवशी ही घटना घडली आहे. मँचेस्टर सिटी सेंटरच्या उत्तरेला असलेल्या क्रम्पसाल येथील मिडलटन रोडवरील हीटन पार्क हिब्रू कॉन्ग्रिगेशन सिनगॉग बाहेर हा हल्ला झाला.

सीएनएनच्या रिपोर्टनुसार, पोलिसांना सकाळी ९ वाजून ३१ मिनिटांनी एका प्रत्यक्षदर्शीचा फोन आला, ज्याने एक वाहन लोकांकडे जात असल्याचे पाहिले. या हल्ल्यादरम्यान एका व्यक्तीवर चाकूने हल्ला करण्यात आला. ही माहिती मिळाल्यानंतर सशस्त्र अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संशयित हल्लेखोराला गोळ्या घातल्या, ज्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसींनी स्पष्ट केले.

योम किप्पूर सर्व्हिसच्या वेळी जेव्हा सिनगॉगमध्ये नेहमीपेक्षा जास्त गर्दी असते, ती वेळ साधून हा हल्ला करण्यात आला.

पीए मीडिया या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानिसार, ब्रिटीश पंतप्रधान केअर स्टार्मर यांनी देशभरातील सिनगॉगमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची घोषणा केली आहे. तसेच या हल्ल्याची वेळ चिंताजनक असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, “ही घटना ज्यू कॅलेंडरमधील सर्वात पवित्र दिवस असलेल्या योम किप्पूरच्या (Yom Kippur) दिवशी घडली, ज्यामुळे ती अधिक भयानक बनली आहे. या हल्ल्यामुळे प्रभावित झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांसोबत माझ्या सहवेदना आहेत.”

स्टार्मर म्हणाले की, “सकाली झालेला हल्ला खूपच धक्कादायक आहे. मी आपत्कालिन बैठक घेण्यासाठी लंडनला परत जात आहे, आणि देशभरातील सिनगॉग्समध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला जात आहे. ज्यू समुदायाला सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व करू.”