UK to Introduce Strict New Rules for Foreign workers Influence Registration Scheme : ब्रिटनमध्ये विदेशी कामगारांना तिथलं कायमस्वरुपी वास्तव्य मिळवण्यास पात्र होण्यासाठी आता पाचऐवजी १० वर्षे वाट पाहावी लागणार आहे. तसेच स्थलांतरितांना एक नवीन चाचण्यांची मालिका पास करावी लागणार आहे. ज्याद्वारे त्यांना ‘चांगले नागरिक’ म्हणून पात्रता सिद्ध करावी लागेल. ब्रिटनमधील लेबर सरकारने याबाबतची घोषणा केली आहे.

गृहसचिव शबाना महमूद याबाबत म्हणाल्या, “लोकांना देशात अनिश्चित काळासाठी राहण्याचा अधिकार मिळवण्यासाठी पात्रता सिद्ध करावी लागेल. याद्वारे त्यांना काही कल्याणकारी लाभ मिळवता येतील. त्यांना यूकेमध्ये हवी ती कामं करण्याचा अधिकार मिळेल. तसेच त्यांना यूकेचं नागरिकत्व प्राप्त करण्याचा मार्ग खुला होईल.” ब्लूमबर्गच्या हवाल्याने हिंदुस्तान टाइम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

दीर्घकालीन वास्तव्यासाठीच्या अर्जासाठी प्रतीक्षा कालावधी दुप्पट

ब्रिटनमधील दीर्घकालीन वास्तव्यासाठीच्या अर्जासाठी प्रतीक्षा कालावधी देखील दुप्पट करण्यात आला आहे. सदर अर्ज करण्यासाठी परदेशी नागरिकांना पाच ऐवजी १० वर्षे प्रतीक्षा करावी लागेल. तसेच इतर काही अटींची पूर्तता करावी लागेल, ज्यामध्ये राष्ट्रीय विमा धोरणात योगदान देण्यापासून ते इंग्रजी शिकण्यापर्यंत आणि स्थानिक संस्थांसाठी स्वयंसेवा करण्यापर्यंतचे काही नियम असू शकतात.

नियम बदलण्याचं कारण काय?

लिव्हरपूल येथे आयोजित लेबर पार्टीच्या वार्षिक परिषदेत शबाना महमूद म्हणाल्या, “देशभरातील लोकांना वाटतंय की परिस्थिती आपल्या व सरकारच्या नियंत्रणाबाहेर चालली आहे. देशातील बेकायदेशीर कामांविषयी काही कानावर येतं, ब्रिटिश कामगारांना हानी पोहोचवलेल्या घटना ऐकायला मिळतात तेव्हा त्यांना असं वाटतं की परदेशी लोकांबाबतचं आपलं धोरण कुठेतरी चुकतंय.”

भारतीयांवर काय परिणाम होईल?

यूकेमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय लोक राहतात. तसेच भारतातून दरवर्षी हजारो लोक ब्रिटनला स्थलांतर करतात. यात कामगार व विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. तिथल्या सरकारच्या नवीन धोरणाचा या सर्वांवर परिणाम होऊ शकतो. कायमस्वरुपी वास्तव्य करता यावं यासाठीचा प्रतीक्षा कालावदी दुप्पट केल्यामुळे ब्रिटनला गेलेल्या भारतीयांवर अनिश्चिततेचं सावट निर्माण झालं आहे. तसेच नवीन चाचण्या पास कराव्या लागणार असल्याने त्यांच्यावरील आर्थिक भार वाढू शकतो.