युक्रेनने ड्रोनद्वारे तेल शुद्धीकरण कारखाने आणि इतर तेल पायाभूत सुविधांवर हल्ला केल्याने रशियातील काही भागांतील पेट्रोल पंपांवरील इंधन समाप्त झाले आहे. परिणामी पेट्रोल पंपांबाहेर वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. २०१४ मध्ये रशियाने युक्रेनकडून बेकायदा पद्धतीने ताब्यात घेतलेल्या क्रिमियन द्वीपकल्पातील सुदूर पूर्वेतील अनेक भागांत ग्राहकांना इंधनाच्या कमतरतेचा फटका बसत असल्याचे वृत्त रशियातील माध्यमांनी दिले आहे.

गेल्या आठवड्यात ‘सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल मर्केंटाइल एक्सचेंज’वर ए-९५ गॅसचे घाऊक दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले होते. त्यात जानेवारीच्या तुलनेत सुमारे ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. उत्तर कोरियाच्या सीमेला लागून असलेल्या प्रिमोरी प्रदेशात पेट्रोल पंपांवर लांब रांगा लागत असून, येथे सुमारे ७८ रूबल प्रति लिटर (अंदाजे ३.५८ डॉलर प्रतिगॅलन) दराने पेट्रोल मिळत असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. विशेष म्हणजे येथील नागरिकांचे सरासरी मासिक वेतन सुमारे १,२०० डॉलर इतके आहे. स्थानिक वृत्तसंस्था ‘प्रिम्प्रेस’च्या पत्रकारांना असे आढळून आले की, काही चालक प्रतिलिटर २२० रूबल (सुमारे १०.१२ डॉलर प्रति गॅलन) ऑनलाइन पेट्रोल विकत होते.