एपी, लंडन : धान्य करारातून रशियाने माघार घेतल्यानंतरही काळय़ा समुद्रातील बंदरांमधून धान्याची निर्यात करण्यास आपण उत्सुक असल्याचे युक्रेनने स्पष्ट केले असून रशियाने मात्र अशा प्रयत्नांना लष्करी साहाय्य देण्यास कडाडून विरोध केला आहे. रशिया युक्रेनच्या बंदरांवर सातत्याने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचे हल्ले करत आहे.

रशियाने काळय़ा समुद्राचा बराचसा भाग सागरी वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेनेही या भागातून वाहतूक करणाऱ्या जहाजांना धोका असल्याचे म्हटले आहे. काळय़ा समुद्राच्या मार्गाने युक्रेनचे धान्य निर्यात करण्यास काही जहाज मालकांनी उत्सुकता दर्शवली आहे, मात्र त्यासाठी धोका काही प्रमाणात कमी व्हावा अशी त्यांची मागणी आहे.

दरम्यान, युक्रेनला धान्य निर्यातीसाठी लष्करी मदत करण्याचा काही प्रस्ताव असल्यास तो धोकादायक आणि अवास्तव असेल, असा इशारा रशियाचे उपराष्ट्रमंत्री सर्गेई वर्शिनिन यांनी शुक्रवारी दिला. रशियाने धान्य करारातून माघार घेतल्यांतर युक्रेनने संयुक्त राष्ट्रांच्या सागरी संघटनेला स्वत:चा वाहतूक मार्ग प्रस्थापित करण्याविषयी पत्र पाठवले आहे तसेच काही नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी घेण्याची हमीही दर्शवली आहे. मात्र, या जहाजांमधून शस्त्रांस्त्रांची निर्यात होऊ शकते असा रशियाचा दावा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.