युक्रेनवर रशिया हल्ला करण्याची शक्यता आहे, असे इशारे अमेरिका आदी मित्रराष्ट्रांकडून वारंवार दिले जात असले तरी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्सकी यांनी ते गांभीर्याने घेतलेले नाही. रशियाचे आणखी काही सैनिक युक्रेनच्या सीमेनजीक आल्याचे रविवारी अमेरिकेने म्हटले असले तरी, रशियाच्या अशा हेतूबाबत अद्याप ठोस पुरावा दिसून येत नाही, असे झेलेन्सकी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काही विमान कंपन्यांनी त्यांची युक्रेनच्या सीमाभागातून होणारी उड्डाणे रद्द केली आहेत, किंवा त्यांचा मार्ग बदलला आहे. 

 रशियाच्या फौजांनी युक्रेनभोवती तीन बाजूंनी जमवाजमव केली असून हा एका लष्करी सरावाचा भाग आहे, असे रशियाचे म्हणणे आहे. या स्थितीत युक्रेनच्या नागरिकांनी शांत राहावे, असे झेलेन्सकी सातत्याने सांगत आहेत.  गेल्या आठवडाभरापासून रशियाच्या या हालचालींबाबत अमेरिकेचे अधिकारी युक्रेनला सावधगिरीचा इशारा देत आहेत. येत्या आठवडय़ाच्या आतच रशियाचे युक्रेनवर आक्रमण होईल, असा त्यांचा दावा आहे. पण तो मानण्यास झेलेन्सकी उघडपणे तयार नाहीत.

गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, युक्रेनवर बुधवारी रशिया चाल करणे अपेक्षित आहे.  

युक्रेन किंवा जगावरच एकाएकी आघात करण्याची संधी आम्ही रशियाला मिळू देणार नाही, असे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुल्लीव्हन यांनी रविवारी सीएनएनशी बोलताना सांगितले.

‘युक्रेनभोवती रशियाचे    १ लाख ३० हजार सैनिक’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कीव्ही  : युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्सकी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली. रशियाकडून युक्रेनवर हल्ला होण्याची भीती व्यक्त केली जात असली तरी, युक्रेन अशा धोक्यापासून पुरेसा सुरक्षित राहू शकतो, यावर झेलन्सकी यांनी या वेळी भर दिला. रशियाचा संभाव्य हल्ला रोखण्यासाठी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि राजनैतिक मोर्चेबांधणी करण्यावर उभय नेत्यांचे एकमत झाले, असे व्हाइट हाऊसतर्फे सांगण्यात आले. काहीतरी कुरापत काढून रशिया युक्रेनवर चाल करेल, असा अमेरिकेचा अंदाज आहे. युक्रेनच्या उत्तर, पूर्व आणि दक्षिण भागात रशियाचे सुमारे एक लाख ३० हजार सैनिक जमा झाल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. गेल्या आठवडय़ात ही संख्या एक लाखाच्या आसपास होती, असा अमेरिकेचा अंदाज आहे.