scorecardresearch

रशियाची चीनकडे लष्करी सामग्रीची मागणी ; अमेरिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट

चीनने रशियाला आर्थिक मदत देऊ करण्याची शक्यता हा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे

वॉशिंग्टन : युक्रेनवरील आक्रमणात वापरण्यासाठी रशियाने चीनकडे लष्करी सामग्रीची मागणी केली असल्याचे अमेरिकेच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने म्हटले आहे. रशियाच्या या विनंतीमुळे, अमेरिका व चीन सरकारांच्या उच्चपदस्थ सहकाऱ्यांमध्ये रोममध्ये होऊ घातलेल्या बैठकीपूर्वी सध्या सुरू असलेल्या युद्धाबाबतचा तणाव वाढला आहे.

रशियन अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या जागतिक निर्बंधांमुळे मिळणारी शिक्षा टाळण्यात रशियाला मदत करणे टाळावे, असा इशारा व्हाइट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांनी या बोलण्यापूर्वी चीनला दिला आहे.‘आम्ही चीनला असे करू देणार नाही,’ असे सुलिवान म्हणाले. यावर, अमेरिका ‘चुकीची माहिती’ पसरवत असल्याचा आरोप चीनने केला.

चीनने रशियाला आर्थिक मदत देऊ करण्याची शक्यता हा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे.युक्रेनमधील युद्ध सुरू ठेवण्यासाठी रशियाने चीनकडून लष्करी सामग्रीसह इतर मदत मिळण्याची अलीकडेच विनंती केली होती, असे अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने संवेदनशील माहितीवरील चर्चेच्या संबंधात नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. ही मदत किती प्रमाणावर मागण्यात आली याचा तपशील त्याने दिला नाही. याबाबतचे वृत्त आधी ‘दि फायनान्शिअल टाइम्स’ व ‘दि वॉिशग्टन पोस्ट’ने प्रकाशित केले होते.

रशियाच्या संबंधात चीन चुकीची माहिती पसरवत आहे, जेणेकरून रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या फौजांना युक्रेनवर रासायनिक किंवा जैविक शस्त्रांनी हल्ला करण्याचा बहाणा मिळेल, असाही आरोप बायडेन प्रशासनाने केला आहे.

रंशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे चीन अमेरिका व युरोपीय महासंघ या दोन सर्वात मोठय़ा व्यापारी भागीदारांच्या संबंधात अडचणीत आला आहे. चीनला या दोन्ही बाजारपेठांत प्रवेश हवा आहे, तरीही रशियासोबतची आपली मैत्री ‘अमर्याद’ असल्याचे सांगून त्याने रशियाला पािठबा दिला आहे.

युक्रेनमधील विमान कारखान्यावर हल्ला; २ ठार

ल्यिव्ह : रशियन फौजांनी युक्रेनमधील विमानाच्या एका कारखान्यावर केलेल्या हल्ल्यात २ जण ठार, तर सात जण जखमी झाले. याशिवाय, एका निवासी इमारतीवर करण्यात आलेल्या गोळीबारात एक जण मारला गेला.अँतोनोव्ह विमान कारखाना हा युक्रेनमधील सर्वात मोठा कारखाना असून, जगातील आजवरच्या सर्वात मोठय़ा अशा अनेक मालवाहू विमानांच्या उत्पादनासाठी तो प्रसिद्ध आहे. या कारखान्यावरील हल्ल्यानंतर फार मोठी आग भडकल्याचे क्यिव्ह शहर प्रशासनाने सांगितले. निवासी इमारतीवर झालेल्या हल्ल्यात एक जण ठार, तर तिघे जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ukraine russia war russia seeks military equipment from china zws

ताज्या बातम्या