Ukraine Russia War : रशिया-युक्रेनमध्ये गेल्या जवळपास दोन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. दोन वर्षांपासून युक्रेनच्या भूमीवर रशिया सातत्याने हल्ले करत आहे, तर युक्रेनही रशिया जशास तंस प्रत्युत्तर देत आहे. रशिया-युक्रेन संघर्षामुळे मोठ्या प्रमाणात जगभरातील अर्थव्यवस्थांना त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे काही दिवसांपासून रशिया-युक्रेनमधील संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करत आहेत. मात्र, त्यांची मध्यस्थी सफल होत नसल्याचं दिसून येत आहे.
डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुति यांची अमेरिकेत नुकतीच भेट झाली. या भेटीत रशिया-युक्रेन संघर्षावर तोडगा निघण्याची अपेक्षा होती. मात्र, या भेटीत कोणताही निर्णय झाल्याचं दिसत नाही. असं असतानाच आता युक्रेनने स्वातंत्र्यदिनीच रशियावर मोठा ड्रोन हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनने रशियाच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एका अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला केला असून या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
रशियाच्या पश्चिमेकडील कुर्स्क भागातील अणुऊर्जा प्रकल्पावर रविवारी ड्रोन हल्ला केल्याचा आरोप मॉस्कोने युक्रेनवर केला आहे. युक्रेन आपल्या स्वातंत्र्याची ३४ वर्षे साजरी करत असताना हा हल्ला झाला आहे. रशियन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी अनेक ऊर्जा प्रकल्पांना ड्रोन हल्ल्यांनी लक्ष्य करण्यात आलं. त्यानंतर कुर्स्क येथील प्लांटमध्ये भीषण आग लागली. मात्र, ती वेळीच आटोक्यात आणण्यात आली. यामध्ये कोणीही जखमी झाल्याचं वृत्त सध्या तरी समोर आलेलं नाही. नाही.
दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये शांततेची चर्चा सुरू असतानाच अशा प्रकारच्या हल्ल्यामुळे आता रशिया-युक्रेन संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. रशियन अधिकाऱ्यांनी सांगितलं की ड्रोन हल्ल्यामुळे प्लांटमधील ट्रान्सफॉर्मरचं नुकसान झालं.
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन भेटीत करार नाही
अलास्का शिखर परिषदेतील डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्यातील भेट रशिया-युक्रेन संघर्ष संपवण्याबाबत किंवा थांबवण्याबाबत कोणत्याही कराराशिवाय संपली. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर त्यांची आणि व्लादिमीर पुतिन यांची अलास्कामध्ये पहिल्यांदाच भेट झाली. या भेटीनंतर त्यांच्यासोबत उभे राहून व्लादिमीर पुतिन यांनी सांगितलं होतं की, २०२० च्या निवडणुकीनंतर ट्रम्प जर व्हाइट हाऊसमध्ये राहिले असते, तर युक्रेनमधील युद्ध सुरूच झाले नसते, असे त्यांना वाटते. “आज, जेव्हा ट्रम्प म्हणतात की जर ते २०२२ मध्ये राष्ट्राध्यक्ष असते, तर युद्ध झालेच नसते आणि मला खात्री आहे की हे खरे आहे. मी याला दुजोरा देऊ शकतो”, असं पुतिन यांनी म्हटलं होतं.