Umar Khalid approaches Supreme Court Riots Conspiracy Case : जेएनयूचा माजी विद्यार्थी आणि कार्यकर्ता उमर खालिद याने दिल्लीमध्ये फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी जामीन मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. खालिद हा गेल्या पाच वर्षांपासून बेकायदा कृती प्रतिबंध (UPA) कायद्याखाली कोठडीत आहे. २ सप्टेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाच्या जामीन नाकारण्याच्या आदेशाविरोधात त्याने आता सर्वोच्च न्यायालयात दाद मगितली आहे. न्यायाधीश नवीन चावला आणि शालिंदर कौर यांच्या विभागीय खंडपीठाने त्याचा जामीन नाकारण्याचा निर्णय दिला होता. तसेच या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने इतर सह-आरोपींचाही जामीन नाकारला होता.
उमर खालिद, शरजील इमाम, अतर खान, खालिद सैफी, मोहम्मद सलीम खान, शिफा-उर-रहमान, मीरान हैदर, गुलफिशा फातिमा आणि शादाब अहमद या आरोपींनी जामिनासाठी अर्ज केले होते. मात्र हे अर्ज नामंजूर करण्यात आल्याचे न्यायालयाने सांगितले. आरोपी २०२० पासून तुरूंगात आहेत आणि त्यांनी त्यांच्या जामीन अर्ज फेटाळण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
शरजील इमाम आणि गुलफिशा फातिमा यांनी यापूर्वीच उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
उच्च न्यायालयाने निकाल देताना असे निरिक्षण नोंदवले की, प्रथमदर्शनी या कटामध्ये इमाम आणि उमर खालिद यांची भूमिका गंभीर होती आणि त्यांनी मुस्लिम समुदायाच्या सदस्यांना मोठ्या संख्येने एकत्र आणण्यासाठी जातीयवादी प्रक्षोभक भाषणे दिली होती. तसेच या निकालामध्ये, खटल्याची गती नैसर्गिकरित्या पुढे जाईल आणि घाईघाईने चालवलेला खटला दोन्ही पक्षांच्या हक्कांसाठी हानिकारक असू शकतो, असेही म्हटले.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने भारतीय दंड संहिता, १८६० आणि बेकायदा कृती (प्रतिबंध) अधिनियम, १९६७ अंतर्गत विविध गुन्ह्यांखाली एफआयआर ५९ दाखल केला होता.
इतर आरोपी कोण आहेत?
या प्रकरणातील इतर आरोपींमध्ये ताहिर हुसेन, खालिद सैफी, ईशरत जहाँ, मीरान हैदर, शिफा-उर-रहमान, आसिफ इक्बाल तन्हा, शादाब अहमद, तस्लीम अहमद, सलीम मलिक, मोहम्मद सलीम खान, अथर खान, सफूरा जरगर, शारजील इमाम, देवांगना कलिता, फैजान खान आणि नताशा नरवाल यांचा समावेश आहे.
जून २०२० मध्ये सफूरा जरगर यांना मानवतेच्या आधारावर त्या गरोदर असल्याने जामीन देण्यात आळा. जून २०२१ मध्ये उच्च न्यायालयाने मेरिटच्या आधारावर अतर तीन आरोपी असिफ इक्बाल तन्हा, देवांगना कलिता आणि नताशा नरवाल यांना जामीन दिला.