कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विषप्रयोगानंतर निर्माण झालेल्या गंभीर आरोग्याच्या समस्येमुळे त्याला पाकिस्तानच्या कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ‘इंडिया टुडे’नं सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त दिलं आहे. विषप्रयोग झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी याची अधिकृत पुष्टी करण्यात आली नाही.

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, मागील दोन दिवसांपासून दाऊद इब्राहिमवर संबंधित रुग्णालयात उपचार केले जात आहेत. रुग्णालयात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून संबंधित मजल्यावर तो एकमेव रुग्ण आहे. फक्त उच्च वैद्यकीय अधिकारी आणि त्याच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांनाच तिथे प्रवेश देण्यात येत आहे. या काळात पाकिस्तानातील इंटरनेट सेवाही बंद होती. समाज माध्यमांद्वारे कोणतेही माहिती बाहेर जाऊ नये, यासाठी सेवा बंद करण्यात आल्याचे बोललं जातं आहे. मुंबई पोलीस अथवा गुन्हे शाखेने या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही. तसेच पाकिस्तानी माध्यमांनीही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत बातमी प्रसिद्ध केलेली नाही. पण पाकिस्तानी समाज माध्यमांवर याबाबत जोरदार चर्चा आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंडरवर्ल्ड डॉनला रुग्णालयात दाखल केल्याच्या वृत्तानंतर मुंबई पोलीस दाऊदचे नातेवाईक अलीशाह पारकर आणि साजिद वागळे यांच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दाऊदची बहीण हसीना पारकरच्या मुलाने जानेवारीमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेला सांगितलं होतं की, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने दुसऱ्यांदा लग्न केल्यापासून तो कराचीमध्येच राहत आहे.