१ फेब्रुवारी रोजी अर्थ मंत्री अरुण जेटली हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी प्रथमच रेल्वे अर्थसंकल्प आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थ संकल्पाआधी अरुण जेटली यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहेत. त्यांचा परिचय करुन देणारा हा लेख. १ डिसेंबर १९५२ रोजी अरुण जेटली यांचा जन्म झाला. अरुण जेटली यांचे वडिल महाराज किशन जेटली हे प्रख्यात वकील होते. दिल्लीतील सेंट झेव्हियर्स शाळेतून त्यांनी आपले शालेय शिक्षण घेतले आणि पदवीचे शिक्षण त्यांनी श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून घेतले. त्यानंतर १९७७ ला त्यांनी विधीची पदवी घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनात अरुण जेटली हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते. १९७४ मध्ये ते दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचे अध्यक्ष बनले. २४ मे १९८२ रोजी त्यांचा विवाह संगीता डोगरा यांच्याशी झाला. त्यांना रोहन आणि सोनाली अशी दोन मुले आहेत.

राजकीय कारकीर्दीला प्रारंभ

अरुण जेटली यांच्या राजकीय कारकीर्दीला महाविद्यालयापासूनच सुरुवात झाली. अरुण जेटली हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते. सुरुवातीच्या काळापासूनच वक्तृत्व आणि वादविवादावर त्यांचे प्रभुत्व होते. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचे ते अध्यक्ष बनले आणि त्यांचा राजकारणाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.

आणीबाणीच्या काळातील कार्य

आणीबाणीच्या काळात अरुण जेटली यांना अटक करण्यात आली होती. जेटली यांना अंबाला येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यानंतर तेथून हलवून तिहारच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. आणीबाणीनंतर ते पुन्हा राजकारणात जोमाने काम करू लागले. त्यांची १९७७ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

एक यशस्वी वकील

१९७७ ला कायद्याची पदवी घेतल्यापासून अरुण जेटली हे एक यशस्वी वकील म्हणून ओळखले जातात. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात ते काम पाहतात. १९९० मध्ये ते दिल्ली उच्च न्यायालयाचे वरिष्ठ विधीज्ञ म्हणून निवडले गेले होते. कायद्याच्या क्षेत्रातील त्यांचे ज्ञान आणि अनुभव पाहून १९९८ ला त्यांची निवड संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेला जाणाऱ्या शिष्टमंडळात झाली होती.

मंत्रिमंडळात नियुक्ती

१३ ऑक्टोबर १९९९ रोजी त्यांची नियुक्ती अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात करण्यात आली. त्यांच्याकडे तंत्रज्ञान आणि प्रसारण या मंत्रालयाचा पदभार सोपवण्यात आले. तेव्हापासून अनेक पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. २६ मे २०१४ पासून ते नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आहे. अल्पकाळासाठी त्यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची देखील जबाबदारी आहे. देशात आर्थिक सुधारणा होणे हे महत्त्वाचे आहे अशी भूमिका ते मांडतात.