करोना आणि लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेचं चक्र संथ झालं आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, त्याचाच एक भाग म्हणून आज ३० लाख विना-राजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनसची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, तात्काळ बोनस वितरित करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दसऱ्यापासूनच दिवाळी सुरू होणार आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जावडेकर म्हणाले की, दसऱ्याच्या अगोदर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर(डीबीटी)द्वारे कर्मचाऱ्यांच्या खात्यात थेट बोनसची रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कॅबिनेटमध्ये आज २०१९-२० साठी प्रोडक्टिव्ह लिंक्ड बोनस(पीएलबी) आणि नॉन प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनसला मंजुरी देण्यात आली आहे.  केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण ३ हजार ७३७ कोटी रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. ३० लाख विना-राजपत्रित  कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

रेल्वे, टपाल, संरक्षण उत्पादन, ईपीएफओ, ईएसआयसी या सारख्या वाणिज्यिक आस्थापनांमधील विनाराजपत्रित १७ कर्मचाऱ्यांना २ हजार ७९१ कोटी रुपयांचा बोनस मिळणार आहे. तसेच, केंद्र सरकारच्या विना-राजपत्रित १३ लाख कर्मचाऱ्यांना नॉन-प्रॉडक्टिविटी लिंक्ड बोनस मिळेल. त्यांना ९०६ रुपये बोनससाठी मिळतील. म्हणजे या आठवड्यात ३० लाख कर्मचाऱ्यांच्या हात ३ हजार ७३७ कोटी रुपये अधिक असतील. बाजारात मागणी वाढेल व सणासुदीच्या काळात मध्यवर्गीयांच्या हाती पैसा येईल. असं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं.

या अगोदर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्सवांसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये अ‍ॅडव्हान्स देण्याची घोषणा केली होती. यंदा सरकारी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी १० हजार रूपयांची योजना लागू केली जाणार आहे. यामध्ये १० हजार रुपयांची अ‍ॅडव्हान्स रक्कम सर्वच केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. कर्मचारी ही रक्कम १० हफ्त्यामध्ये जमा करू शकणार आहेत. मार्च २०२१ पर्यंतच ही योजना लागू असणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union cabinet approves bonus for 30 lakh non gazetted employees of central govt msr
First published on: 21-10-2020 at 17:26 IST