आतापर्यंत चेहरा गोरा करण्याचा दावा करणा-या फेअरनेस क्रीम्सची खुलेआम विक्री केली जात होती. पण आता या क्रीम्स विकत घेणं कठीण होणार आहे. सरकारने फेअरनेस क्रीम्ससाठी नवे नियम लागू केले आहेत. आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय फेअरनेस क्रीम्स विकत घेता येणार नाहीत. कारण अनेक फेअरनेस क्रीम्समध्ये स्टेरॉईड आणि अँटीबायोटीकचा समावेश असल्याचं समोर आलं होतं.
अशा क्रीम्समुळे चेहऱ्यावर बारीक पुरळ किंवा स्कीन बर्नचा धोका उद्भवतो. त्वचेचा पोत खराब होऊन त्वचेला गंभीर दुखापतीचीही शक्यता असते. चेहऱ्यावर या क्रीमच्या वापरानं केस (लव) वाढ होण्याचीही भीती असते. हा सर्व धोका लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्टेरॉईड आणि अँटीबायोटीकचा समावेश असलेल्या १४ क्रीम्सच्या सरसकट विक्रीवर बंदी आणली आहे. या नियमांचं पालन केलं नाही तर एफडीएच्या कारवाईला सामोरं जावं लागेल. 23 मार्च रोजी याबाबतची सूचना देण्यात आली होती.