केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी जम्मू -काश्मीर दौऱ्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी श्रीनगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केले. आपल्या भाषणादरम्यान, त्यांनी बुलेट प्रूफ ग्लास शील्ड काढली आणि त्यानंतर भाषणाला सुरुवात केली. मला तुमच्या लोकांशी मोकळेपणाने बोलायचे आहे. मला तुमच्या लोकांशी बोलायचे आहे, पाकिस्तानशी नाही असेही अमित शाह यांनी म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याचा सोमवारी तिसरा दिवस होता. श्रीनगरला येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा सरकारकडून दिल्या जाणाऱ्या विकास प्रकल्पांचा उल्लेख केला. काश्मीरचे खोरे भारताला येत्या काळात जागतिक महासत्ता बनविण्यात मदत करेल असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

भाषणादरम्यान त्यांनी स्टेजवरून बुलेट प्रूफ काचेची शिल्ड काढून टाकली. “मला खूप टोमणे मारले गेले. खूप कठोरपणे बोलले गेले. पण मला आज तुमच्याशी मोकळेपणाने बोलायचे आहे. म्हणूनच मी तुमच्याशी बुलेट प्रूफ शिल्डशिवाय बोलत आहे, असे अमित शाह म्हणाले.

“सरकारने पाकिस्तानशी चर्चा करावी अशी सूचना फारुक अब्दुल्ला यांनी केल्याचे मी वृत्तपत्रांत वाचले. त्यांना आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, मात्र त्याऐवजी आपण काश्मिरी युवकांशी बोलायला हवे,” असे शेर-ई-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये (एसकेआयसीसी) आयोजित कार्यक्रमात बोलताना शहा यांनी सांगितले. ‘अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा एकमेव उद्देश काश्मीर, जम्मू व नवनिर्मित लडाख यांना विकासाच्या मार्गावर आणण्याचा आहे. आमच्या प्रयत्नांची फळे तुम्हाला २०२४ पर्यंत दिसून येतील’, असेही गृहमंत्री म्हणाले.

त्यानंतर अमित शाह यांनी पुलवामा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कॅम्पला भेट दिली. अमित शाह यांनी रात्री सीआरपीएफ कॅम्पमध्ये राहून जवानांसोबत जेवण केले. याबाबत त्यांनी ट्विट करून त्यांनी माहिती दिली. “मला निमलष्करी दलाच्या जवानांसोबत वेळ घालवायचा आहे, त्यांना भेटून त्यांचे अनुभव आणि अडचणी जाणून घ्यायच्या आहेत,” असे त्यांनी म्हटले आहे. अमित शाह यांच्यासोबत जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हाही सीआरपीएफ कॅम्पमध्ये होते.