लोकसभेत मोदी सरकारविरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु आहे. आज या चर्चेदरम्यान लोकसभेत आज राहुल गांधी यांचं भाषण झालं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली. तसंच ते मणिपूरला जात नाहीत कारण ते मणिपूरला भारताचा भाग मानतच नाहीत असा आरोप केला. यानंतर स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच त्यांनी मणिपूरवर बोलत असताना काँग्रेसवर कडाडून टीका केली. काश्मिरी पंडितांची हत्या झाली तेव्हा काँग्रेस काय करत होतं? असा प्रश्न स्मृती इराणींनी विचारला. तसंच गिरीजा टिक्कू या काश्मिरी महिलेचा उल्लेख केला. गिरीजा टिक्कू कोण होती आणि तिच्यासह काय घडलं होतं? जाणून घेऊ
कोण होती गिरीजा टिक्कू ?
गिरीजा टिक्कू काश्मीरच्या एका सरकारी शाळेत लायब्ररियन म्हणून काम करत होती. तिचं लग्न बांदीपोरा येथील एका काश्मिरी पंडिताशी झालं. त्यावेळी समोर आलेल्या बातम्यांनुसार १९९० मध्ये गिरीजा टिक्कूचं अपहरण पाच लोकांनी केलं. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिची लाकडं कापण्याच्या मशीनने तुकडे तुकडे करुन हत्या करण्यात आली. त्यानंतर गिरीजाच्या पतीचीही हत्या करण्यात आली. गिरीजा टिक्कू यांची भाची सिद्धी रैना यांनी इंस्टाग्राम पोस्ट करुन हे वास्तव समोर आणलं. १९९० च्या दशकात ही घटना घडली होती.
गिरीजा टिक्कूवर वारंवार बलात्कार
गिरीजा टिक्कूच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचं आणि तिचं लैंगिक शोषण झाल्याचं समोर आलं. तिच्यावर अनेकदा सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिचं पोट कापलं होतं. तिच्या शवविच्छेदन अहवालात हे उल्लेख करण्यात आले होते.
गिरीजा टिक्कू यांचं कुटुंब तीन दशक शांत होतं. मात्र काश्मीर फाईल्स हा सिनेमा आला त्यानंतर त्यांच्यावरचे अत्याचार समोर आले. त्यांची भाची सिद्धी रैना यांनी इंस्टाग्राम पोस्ट लिहून यावर भाष्य केलं होतं. ही पोस्ट चांगलीच व्हायरलही झाली होती. आज लोकसभेत स्मृती इराणी यांनी याच गिरीजा टिक्कूंचा उल्लेख केला आणि काँग्रेसला प्रश्न विचारला.
काय म्हणाल्या स्मृती इराणी?
“आज माझा काँग्रेसला सवाल आहे काश्मीरमध्ये काय घडलं? तुम्ही म्हणजे इंडिया नाही कारण तुम्ही देशात भ्रष्टाचार आणला. मणिपूर हे आपल्या देशाचं अभिन्न अंग आहे. मणिपूर वेगळं नाही आणि कधी होणारही नाही. आज तुम्हाला मी एक चेहरा या सदनात दाखवते. हा चेहरा आहे गिरीजा टिक्कूचा. १९९० च्या दशकात गिरीजा टिक्कू ही आपला पे चेक घेण्यासाठी गेली होती. बसने घरी परतण्याचा प्रयत्नात होती. तिला पाच माणसां बसमधून खेचून टॅक्सीत कोंबलं. तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर कुऱ्हाडीने तिचे तुकडे तुकडे केले. गिरीजा टिक्कूच्या आयुष्यावर एका सिनेमात भाष्य करण्यात आलं तेव्हा काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी त्याला प्रपोगंडा म्हटलं आहे. तुम्ही काश्मिरी पंडितांवरचे अन्याय ऐकणार की नाही? ” असा प्रश्न स्मृती इराणींनी विचारला.