United States China Tariff War : अमेरिका आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून व्यापार युद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर तब्बल २४५ टक्के व्यापार कर लादण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे अमेरिकेच्या व्यापार शुल्काच्या विरोधात चीननेही जशास तशी भूमिका घेत अमेरिकन उत्पादनावर १२५ टक्के कर जाहीर केला होता. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये चांगलंच ‘टेरिफ वॉर’ रंगल्याचं पाहायला मिळालं होतं.

दरम्यान, आता अमेरिका आणि चीनमधील ‘टॅरिफ’बाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. दोन्ही देशांमधील व्यापारी तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी सकारात्मक पावले उचलली होती. यानंतर अखेर आता चीन आणि अमेरिकामध्ये व्यापार कराराची घोषणा करण्यात आली आहे. व्हाईट हाऊसकडून अमेरिकन अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे झालेल्या दोन दिवसांच्या व्यापार चर्चेनंतर अमेरिका आणि चीनमध्ये प्राथमिक करार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, या कराराची सविस्तर माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. याबाबत अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी म्हटलं की, या चर्चेत मोठी प्रगती झाली आहे. तसेच ही चर्चा सकारात्मक होती. आम्ही उद्या याबाबतचा सविस्तर तपशील उद्या देऊ. मी तुम्हाला सांगू शकतो की सर्व चर्चा सकारात्मक होत्या”, असं स्कॉट बेसेंट यांनी सांगितलं.

तसेच स्कॉट बेसेंट यांनी पुढे म्हटलं की, चीन बरोबरच्या बैठकीनंतर एक करार केला आहे. यामुळे अमेरिका आपली व्यापार तूट कमी करू शकेल. पण यानेळी त्यांनी या कराराबद्दल जास्त माहिती दिली नाही. तसेच स्विस सरकारने आम्हाला हे अद्भुत ठिकाण उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार”, असंही त्यांनी सांगितलं. या चर्चेवेळी अमेरिकेच्या शिष्टमंडळात स्कॉट बेसेंट, व्यापार प्रतिनिधी राजदूत जेमिसन ग्रीर आणि उपपंतप्रधान आणि दोन उपमंत्री यांच्यासह काही वरिष्ठ चिनी अधिकारी होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेमिसन ग्रीर यांनी म्हटलं की, “दोन्ही देश किती लवकर करारावर पोहोचू शकले हे ओळखणं महत्त्वाचं आहे, हे यावरून सूचित होतं की मतभेद पूर्वीप्रमाणे व्यापक नसतील. असं असलं तरी या दोन दिवसांत बरीच पायाभूत कामे झाली. अमेरिकेची व्यापार तूट $१.२ ट्रिलियन इतकी आहे. चिनी भागीदारांसोबत आम्ही केलेला करार आम्हाला त्या राष्ट्रीय आणीबाणीचे निराकरण करण्यासाठी काम करण्यास मदत करेल”, असं जेमिसन ग्रीर यांनी सांगितलं.