United States China Tariff War : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळालेलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर तब्बल २४५ टक्के कर लादण्याची घोषणा केली होती. तसेच अमेरिकेच्या या व्यापार शुल्काविरुद्ध लढणार असल्याची भूमिका चीनने घेतली होती. तसेच चीननेही अमेरिकन उत्पादनावर १२५ टक्के कर जाहीर केला होता. त्यामुळे अमेरिका आणि चीनमधील ‘टेरिफ वॉर’ चांगलंच चर्चेत आलं होतं.

आता अमेरिका आणि चीनमध्ये ‘टॅरिफ’वरून दोन्ही देशांत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही देशांमधील व्यापारी तणाव कमी करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. दरम्यान, दोन्ही देशांचे अधिकारी टेरिफच्या मुद्यांवरून जिनेव्हा येथे भेटणार असून या बैठकीत टॅरिफबाबत तोडगा काढणार असल्याची माहिती सांगितली जात आहे.

स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट आणि व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी चीनचे उपपंतप्रधान हे लाइफेंग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी भेट होणार आहे. चीनची शिन्हुआ वृत्तसंस्था आणि दोन्ही देशांच्या राजदूतांनी या चर्चेला दुजोरा दिला आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीनमध्ये ‘टॅरिफ’वरून सुरु असलेला तणाव कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या चर्चेतून कोणताही मोठा करार होण्याची शक्यता कमी मानली जात असली तरी तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की अमेरिका आणि चीन एकमेकांविरुद्धचे शुल्क काही प्रमाणात कमी करू शकतात. जर असं झालं तर जागतिक वित्तीय बाजारपेठा आणि अमेरिका-चीन व्यापारावर अवलंबून असलेल्या कंपन्यांना मोठा दिलासा मिळू शकेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातीवर मोठ्या प्रमाणात शुल्क लादल्यानंतर चीननेही अमेरिकन उत्पादनांवर शुल्क वाढवून प्रत्युत्तर दिलं होतं आणि त्यामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार युद्ध सुरू झालं होतं. मात्र, आता दोन्ही देशांकडून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं दिसून येत आहे.