उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात सीबीआयने बुधवारी दाखल केलेल्या दुसऱ्या आरोपपत्रात भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगरच्या नावाचा समावेश केला आहे.  कुलदीप सिंह सेंगरने घरात घुसून पीडित तरुणीवर बलात्कार केला त्यावेळी त्याची महिला साथीदार शशी सिंह दरवाजाबाहेर पहारा देत होती असे सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे. ४ जून २०१७ रोजी संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान बलात्काराची ही घटना घडली. मागच्या आठवडयात सीबीआयने पहिले आरोपपत्र दाखल केले. त्यामध्ये सेंगरचा भाऊ जय दीप सिंह याच्यासह पाच आरोपींच्या नावाचा समावेश होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागच्यावर्षी नोकरीच्या निमित्ताने १७ वर्षीय पीडित तरुणी कुलदीप सिंह सेंगरला भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्याने बलात्कार केला असा आरोप तरुणीने केला आहे. पीडित तरुणीने न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला तसेच तिच्या वडिलांचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर योगी सरकारला जाग आली व तातडीने पावले उचलली गेली.

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर चहूबाजूंनी जोरदार टीका झाली. सरकार आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न करत असल्याचे आरोप झाल्यानंतर निष्पक्ष तपासासाठी राज्य सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले. उत्तर प्रदेशातील बांगरमऊ येथून आमदार असलेल्या कुलदीप सिंह सेंगरवर पीडित तरुणीने सुरुवातीपासून बलात्काराचा आरोप केला आहे.

या प्रकरणी २० जूनला एफआयआर आणि त्यानंतर दाखल झालेल्या आरोपपत्रात स्थानिक पोलिसांनी कुलदीप सिंह सेंगर आणि अन्य आरोपींच्या नावाचा समावेश केला नाही. स्थानिक पोलिसांनी पीडित तरुणीच्या वैद्यकीय तपासणीला विलंब केला तसेच तिचे कपडे फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवले नाहीत. आरोपींशी हातमिळवणी करुन जाणीवपूर्व सर्व गोष्टींना विलंब लावण्यात आला असे सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले. सेंगर, शशी सिंह आणि अन्य आरोपींना सीबीआयने १३ आणि १४ एप्रिलला अटक केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unnao gang rape case bjp mla kuldeep singh sengar cbi chargesheet
First published on: 11-07-2018 at 19:08 IST