उन्नाव बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेला कुलदीप सिंह सेंगर तुरुंगातून बाहेर येणार आहे. उन्नाव बलात्कार प्रकरणातला कुलदीप सिंह सेंगर हा भाजपाचा माजी आमदार आहे. भाजपामधून त्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. २०१७ मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणात कुलदीप सेंगरला अटक करण्यात आली होती. यानंतर आता मुलीच्या लग्नासाठी जामीन मिळावा म्हणून कुलदीप सेंगरने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
जस्टिस सिद्धार्थ मृदूल आणि तलवंत सिंह यांच्या खंडपीठाने २२ डिसेंबरला ही सुनावणी दुसऱ्या पीठासमोर व्हावी असे निर्देश दिले होते. कुलदीप सेंगने मुलीच्या लग्नासाठी जे ८ फेब्रुवारीला होणार आहे त्यात सहभागी होण्यासाठी दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मागितला होता. १८ जानेवारीपासून लग्नाचे विधी सुरू होणार आहेत असं सेंगरच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं होतं.
त्यानंतर आता कुलदीप सेंगरला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
दिल्ली कोर्टाने उन्नाव बलात्कार प्रकरणात कुलदीप सेंगरला २०१९ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर सीबीआय कोर्टाने या प्रकरणात कुलदीप सेंगरला २५ लाख रूपये दंडही ठोठावला होता. कुलदीप सेंगर चारवेळा आमदार होता. त्याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. कलम ३७६ आणि POCSO कायद्याच्या अंतर्गत सेंगरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.