Man’s Body Found Rotting In A Drum राजस्थानाच्या खैरथल तिजारा जिल्ह्यातील भाड्याच्या घरा एका निळ्या ड्रममध्ये एका तिशीतील पुरूषाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. येथे एका व्यक्तीचा मृतदेह त्याच्या भाड्याच्या घराच्या पहिल्या मजल्यावर एका निळ्या ड्रममध्ये कुजत असल्याचे आढळून आले आहे, रविवरी पोलिसांनी याबद्दल माहिती दिली. या घटनेमुळे पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील घटनेच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. मेरठमध्ये अशाच प्रकारे एका निळ्या ड्रममध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता, ज्याची संपूर्ण देशभर चर्चा झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला हा माणूस एका वीटभट्टीवर काम करत होता आणि त्याचे नाव हंसराज असे आहे. तसेच घटनेपासून त्याची पत्नी आणि तीन मुले बेपत्ता आहेत, असेही पोलिसांनी सांगितले. एका निळ्या ड्रममध्ये मृतदेह भरून तो बंद करण्यासाठी त्याच्यावर दगड ठेवण्यात आला होता, जेणेकरून दुर्गंधी बाहेर येऊ नये.
जिल्ह्यातील किशनगड बास सर्कलमध्ये तैनात डेप्युटी एसपी राजेंद्र सिंह यांनी सांगितले की “आम्हाला दुपारी कळवण्यात आले की आदर्श कॉलनीमधील एका घरातून दुर्गंधी येत आहे. वरच्या मजल्यावर राहणारे भाडेकरू बेपत्ता होते, पण तिथे एक ड्रम होता…. हा ड्रम उघडला असता आम्हाला आतमध्ये एक मृतदेह सापडला. तो उत्तर प्रदेशातील भाडेकरू हंसराज उर्फ सूरजचा होचा, तो येथील एका वीटभट्टीवर काम करत होता. मृतदेह कपड्यांच्या ढिगाऱ्याखाली होचता आणि त्यावर मीठ लावलेले होते. मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे आणि त्याच्या नातेवाईकांना कळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्याची पत्नी आणि त्यांची तीन मुले तसेच घरमालगाचा मुलगा जितेंद्र देखील बेपत्ता आहे.”
“पीडित व्यक्ती हा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे आणि किशनगड बास भागात एका वीटभट्टीवर काम करत होता. १५ दिवसांपूर्वी त्याने घर भाड्याने घेतले होते. तेथे तो त्याची पत्नी आणि तीन मुलांबरोबर राहात होता. पोलीस घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे अधिकाऱ्यांनी सांगतले. तसेच या व्यक्तीचा मृतदेह ड्रममध्ये किती काळ होता किंवा त्याच्या हत्येमागील नेमके कारण काय आहे हे अद्याप कळू शकलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले.
किशनग़ बास पोलीस ठाण्याचे एसएचओ जितेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले की, शर्मा कुटुंबाने हंसराम आणि त्याची पत्नी सुनिता उर्फ लक्ष्मी यांना दीड एक महिन्यापूर्वी वरच्या मजल्यावरील एक रुम आणि किचन भाड्याने देण्यात आले होते. “सुनिता, तीन मुले आणि जितेंद्र शर्मा हे सध्या बेपत्ता आहेत, प्रथमदर्शनी असे दिसून येते की सुनिता आणि जितेंद्र यांचे नाते होते आणि दोघांनी मिळून हंसरामची हत्या केली. जितेंद्रच्या पत्नीचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे.”
रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास शेजाऱ्यांनी दुर्गंधी येत असल्याबद्दल सांगितले. मृतदेह शापडल्यानंतर एफएसएल पथक घटनास्थळी पोहचले. हंसराम हा मूळचा उत्तर प्रदेशच्या शहजाहपूरच्या नवादिया नवाझपूर गावातील आहे.
मार्च महिन्यात उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे पत्नी आणि तिच्या प्रियकराने एका व्यक्तीची हत्या केली होती. आरोपींनी मृतदेहाचे तुकडे करून सिमेंटसह एका निळ्या ड्रममध्ये भरले होते. पण त्या महिलेची मुलगी शेजाऱ्यांना वडील ड्रममध्ये असल्याचे सांगू लागल्याने हा गुन्हा उजेडात आला होता.