UP man run for 26 years arrested Crime News : सौदी अरेबियामध्ये १९९९ मध्ये झालेल्या एका हत्येच्या आरोप असलेल्या व्यक्तीला २६ वर्षांहून जास्त काळ फरार राहिल्यानंतर अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सीबीआयने या आरोपीला अटक केली असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने शनिवारी दिली.

मोहम्मद दिलशाद असे अटक करण्यात आलेल्या व्यकीचे नाव असून त्याला ११ ऑगस्ट रोजी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली. तो मदीनाहून जेद्दाहमार्गे नवीन ओळखपत्र आणि पासपोर्ट घेऊन भारतात परतला होता.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलशाद हा रियाधमध्ये हेवी मोटर मेकॅनिक आणि सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. यादरम्यान १९९९ मध्ये त्याने कामाच्या ठिकाणी एका व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप आहे.

तो सौदीतील अधिकाऱ्यांना चकवा देऊन भारतात पळून आला, येथे त्याने गैरमार्गांनी नवीन ओळखपत्र आणि पासपोर्ट मिळवला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नवीन पासपोर्ट वापरून दिलशाद हा यंत्रणांना फसवत राहिला, इतकेच नाही तर या पासपोर्टवर तो आखाती नेहमी देशांमध्ये प्रवास करत होता.

सौदी अरेबियाच्या विनंतीवरून एप्रिल २०२२ मध्ये सीबीआयने फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर खटला चालवण्यासाठी हे प्रकरण त्यांच्याकडे घेतले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

सीबीआयने यानंतर दिलशाद याच्या उत्तर प्रदेशच्या बिजनोर जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावापर्यंत शोध घेतला, त्यानंतर लूक आऊट सर्क्युलर देखील जारी करण्यात आले.पण याचा फारसा फायदा झाला नाही आणि आरोपी नियमीतपणे परदेशात प्रवास करत राहिला. कारण लूक आऊट सर्क्युलर हे त्याच्या जुन्या कागदपत्रांच्या आधारे काढण्यात आले होते.

तपास सुरू असताना असे आढळून आले की दिलशादने गैरमार्गाने मिळवलेल्या नव्या ओळखीचा फायदा घेत तो कतार, कुवेत आणि सौदी अरेबियामध्ये प्रवास करायचा, असे सीबीआयच्या प्रवक्त्याने सांगितले. त्यांनी सांगितले की वेगवेगळ्या पद्धती आणि ह्युमन इंटेलिजन्स यांच्या मदतीने या पासपोर्टचा शोध घेण्यात आला, यानंतर नवीन लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले.

या घडामोडींबद्दल माहिती नसल्याने दिलशाद हा बिनधास्तपणे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११ ऑगस्ट रोजी दाखल झाला. त्याचे विमान मदिनामार्गे जेद्दाहून आले होते. तो आल्याबरोबर इमिग्रेशन विभागाने सीबीआयला कळवले आणि त्यानंतर सीबीआयने त्याला ताब्यात घेतले.