उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष करून गंगा नदीच्या पात्रा लगत असलेल्या जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री संजय निषाद यांनी कानपूर मधील पूरग्रस्त भागाचा सोमवारी दौरा केला. यावेळी त्यांनी गावकऱ्यांना धीर देत असताना केलेले एक विधान वादात अडकले आहे. पूरग्रस्तांना दिलासा देताना ते म्हणाले, “तुम्ही गंगेची लेकरे आहात. तुमचे पाय धुण्यासाठी गंगा माता स्वतः तुमच्या दारापर्यंत आली आहे. यामुळे आता तुम्हाला स्वर्गप्राप्तीचे भाग्य मिळेल.”
उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येक मंत्र्याला पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी जिल्हे वाटून दिले आहेत. यानुसार निषाद कानपूरच्या ग्रामीण भागात गेले होते. यावेळी गावकऱ्यांनी त्यांना आपल्या समस्या सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र निषाद यांनी त्यांना आध्यात्मिक सल्ला दिला. त्यांच्या विधानाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मंत्री निषाद हे गावातील लोकांना ते किती भाग्यवान आहेत, हे सांगत होते. यावेळी एका वृद्ध महिलेने त्यांना म्हटले की, तुम्ही आमच्याबरोबर राहायला या आणि गंगा मातेचे दर्शन घ्या.
"माँ गंगा, गंगापुत्रों के चरण धोने आती है,
— Sadaf Afreen صدف (@s_afreen7) August 5, 2025
और गंगापुत्र सीधे स्वर्ग में जाते हैं"
कितना आसान है न गरीब और अशिक्षित लोगो को मूर्ख बनाना??
यह मंत्री संजय कुमार निषाद है!
कानपुर देहात के बाढ़ प्रभावित गाँव के लोगों ने जब मंत्री जी को हो रही समस्याओं के बारे में बताने की कोशिश की,… pic.twitter.com/DMdrUxsDdG
मंत्री निषाद यांच्या विधानावर आता टीका होत आहे. द इंडियन एक्सप्रेसशी बोलत असताना संजय निषाद यांनी व्हायरल व्हिडीओवर भाष्य केले. ते म्हणाले, पूर येणे हे नैसर्गिक संकट असून सरकार बाधितांना मदत करण्यासाठी हरऐक प्रकारे प्रयत्न करत आहे. आम्ही जेवणाचे पाकिटे, तयार अन्न वाटत आहोत. तसेच त्यांना सकारात्मक विचार देणे गरजेचे आहे, त्यातून मी ते विधान केले होते. मी फक्त गावकऱ्यांना भावनिक आधार देण्याचा प्रयत्न केला होता.
मंत्री संजय निषाद पुढे म्हणाले, आम्ही पुराच्या पाण्याला रोखू शकत नाही. ही एका दिवसाची किंवा एका वर्षातील समस्या नाही. त्यामुळे आम्ही गावकऱ्यांना मदतीबरोबरच भावनिक आधारही देण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांना सकारात्मक विचार करण्यास मी प्रेरित केले. अन्यथा विरोधक तर नकारात्मकता पसरवत आहेत.