UP School : एका नर्सरीच्या विद्यार्थ्याने शाळेत जेवणाच्या डब्यात नॉनव्हेज आणल्यामुळे विद्यार्थ्याला थेट शाळेतून काढून टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील एका खासगी शाळेत घडला आहे. एवढंच नाही तर विद्यार्थ्याने शाळेमध्ये डब्यात नॉनव्हेज आणल्याचे पाहून शाळेचे मुख्याध्यापक संतापल्याचेही समोर आले आहे. या घटनेसंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापकाने शाळेतील एका विद्यार्थ्याने जेवणाच्या डब्यामध्ये नॉनव्हेज आणल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर मुख्याध्यापकाने एका विद्यार्थ्याला शाळेमधून काढून टाकले. यानंतर मुलाची आई आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्यामध्ये जोरदार वादावादी देखील झाल्याचे दिसत आहे. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली आहे.

हेही वाचा : “गॅस तुझा बाप देतो काय?” ऑटो कॅन्सल केल्याचा राग! चालकानं तरुणीबरोबर केलं धक्कादायक कृत्य; पाहा Video

व्हिडीओमध्ये शाळेचे मुख्याध्यापक आणि मुलाच्या आईमध्ये शा‍ब्दिक वाद सुरु असल्याचे दिसून येत आहे. तसेच शाळेचे मुख्याध्यापक मुलाच्या आईला सांगताना दिसत आहेत की, आम्ही अशा मुलांना शिकवू इच्छित नाहीत जे नॉनव्हेज शाळेत आणतील. तसेच तुमचा मुलगा प्रत्येकाला नॉनव्हेज देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना इस्लाम स्वीकारण्याविषयी बोलतो, असा आरोप मुख्याध्यापकांनी केल्याचं वृत्तात म्हटले आहे. मात्र, यावर विद्यार्थ्याने शाळेत नॉनव्हेज आणले नसल्याचे स्पष्टीकरण मुलाची आई देत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यापकांनी केलेल्या आरोपावर मुलाच्या आईने सांगितले की, ७ वर्षांचा मुलगा अशा गोष्टींबद्दल बोलू शकत नाही. ज्यावर मुख्याध्यापक म्हणाले की, मुलांना हे सर्व त्यांच्या पालकांनी शिकवलं आहे. तसेच इतर विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तक्रारी येत असल्यामुळे विद्यार्थ्याचे नाव शाळेच्या रजिस्टरमधून काढून टाकण्यात आल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी मुलाच्या आईने शाळेतील आणखी एका मुलावर तिच्या मुलाला मारहाण करण्याचा आणि वारंवार त्रास दिल्याचा आरोप केल्याचेही व्हिडीओत दिसत आहे. यावर मुख्याध्यापकांनी उत्तर देताना सांगितलं की, तुम्ही आता दुसऱ्या विद्यार्थ्यावर आरोप करून शाळेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहात. दरम्यान, या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर पोलिसांनी याची दखल घेतली आहे. अमरोहा पोलिसांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे.