Crime News : उत्तर प्रदेशमध्ये स्वत:ची बुद्धी वाढेल म्हणून लोकांना ठार करून त्यांचा मेंदू खाणार्या एका ‘सिरीयल किलर’ला दुसर्यांदा जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. लखनौ न्यायालयाने शुक्रवारी त्याला २५ वर्ष जुन्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात ही शिक्षा सुनावली आहे. यानंतर भारतातील सर्वात क्रूर गुन्ह्यांपैकी एक मानले जाणारे आणि अधिकृतपणे दुर्मिळातील दुर्मिळ घटना म्हणून नोंदवण्यात आलेले राम निरंजन उर्फ राजा कोलंदरचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
२५ वर्षे जुने हे प्रकरण हाताळणाऱ्या उत्तर प्रदेश पोलीस अधिकार्यांनी सांगितले की, निरंजन हा त्याच्या बळींचे शीर धडावेगळे करणे, मानवी कवटी जपून ठेवणे याबरोबरच स्वत:ची शक्ती आणि बुद्धी वाढेल अशा समजुतीतून कथितपणे मानवी मेंदू खाण्यासाठी ओळखला जातो.
अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने कोलंदरचा मेहुणा वक्षराज यालाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून त्यांना प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला न्यायालयात रायबरेली येथील २२ वर्षीय मनोज कुमार सिंह आणि त्याचा चालक रवि श्रीवास्ताव यांच्या जानेवारी २००० रोजीच्या अपहरण आणि निर्घृण हत्या प्रकरणात दोषी आढळले होते. त्यानंतर ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशच्या इतिहासातील सर्वात भयंकर गुन्हा
कोलंदर हा दुसऱ्या एका हत्येच्या प्रकरणात सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. पत्रकार धिरेंद्र सिंह यांचा प्रयागराज येथे शीर धडावेगळं केलेला मृतदेह आढळून आल्यानंतर कोलंदर हा पहिल्यांदा देशभरात चर्चेत आला होता. या हत्येच्या चौकशीदरम्यान इतर अनेक हत्यांचे धागेदोरे उलगडत गेले. इतकेच नाही हत्येबरोबरच नरभक्षण आणि शरीराचे तुकडे केल्याचे अनेक भयानक गुन्हे उघडकीस आले. तपास यंत्रणा आणि न्यायालयाने या प्रकाराला उत्तर प्रदेशच्या गुन्हेगारी इतिहासातील सर्वात निर्दयी आणि भयानक गुन्हे असे म्हटले आहे.
प्रकरण काय आहे?
दरम्यान आत्ता सुनावण्यात आलेली शिक्षा ही मनोज सिंह आणि रवि श्रीवास्तव यांचे अपहरण आणि हत्या यासंबंधी आहे. या दोघांना २४ जानेवारी २००० रोजी ते लखनौवरून रेवा साठी भाड्याने घेतलेल्या टाटा सुमो गाडीमध्ये निघाले तेव्हा अखेरचं पाहिलं गेलं होते. तसेच त्यांनी कोलंदरची पत्नी फूलन देवी हिला पॅसेंजर म्हणून चारबाग रेल्वे स्टेशनवरून गाडीत घेतल्याचे सांगितले जाते. जेव्हा हे दोघे परतले नाहीत तेव्हा सिंह यांच्या कुटुंबियांनी ते हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांचे नग्न आणि तुकडे केलेल्या अवस्थेतील मृतदेह प्रयागराज जिल्ह्यातील शंकरगड जवळच्या जंगलात आढळून आले होते.