उत्तर प्रदेशातील सिद्धार्थ नगरमधील धोमरियागंज मतदारसंघातील बलवा गावातील एका मंदिरात मुस्लिम आमदार सैय्यदा खातून यांनी भेट दिली. या मंदिरात गावकऱ्यांनी महाचंडी यज्ञाचे आयोजन केले होते. यासाठी त्या मंदिरात आल्या होत्या. परंतु, त्या येऊन गेल्यानंतर हिंदू संघटनेच्या सदस्यांनी रविवारी हे मंदिर गंगाजल शिंपडून शुद्ध केल्याचा दावा केला जातोय. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
सैय्यदा खातून यांनी मंगळवारी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “भ्रष्ट लोकांनी निर्माण केलेल्या वादांमुळे मी मंदिरांमध्ये जाणं थांबवणार नाही. मी अनेक मंदिरांसाठी काम केले आहे आणि त्या ठिकाणी भेट दिली आहे. काही लोक वैयक्तिक लक्ष वेधण्यासाठी माझ्या भेटीबाबत विनाकारण वाद निर्माण करत आहेत.”
सैय्यदा खातून वेगळ्या धर्मातील असल्याने त्यांच्या येण्याने मंदिराचे पावित्र्य भंग झाल्याचा दावा हिंदू संघटनेच्या सदस्यांनी केला आहे. त्यामुळे बरहनी चाफा नगर पंचायतीचे अध्यक्ष धर्मराज वर्मा यांच्या नेतृत्वाखाली लोकांच्या एका गटाने मंदिरात गंगाजल शिंपडले. वर्मा म्हणाले की आमदार खातून यांनी आमच्या मंदिराचा अनादर केला आहे. त्या मांसाहारी असल्याने त्यांनी मंदिरात जाणं टाळावं.
या वादानंतर पोलिसांनी बलवा गावात चोख बंदोबस्त ठेवला आहे. मात्र, त्यांनी अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही.सिद्धार्थ नगर मंडल अधिकारी सुजित कुमार राय यांनी सांगितले की, याप्रकरणी कोणीही तक्रार दाखल केलेली नाही.