एक महिला पोलीस अधिकारी तिचं लग्न ठरल्यानंतर बेपत्ता झाली आहे. तिचं पद्धतशीर ‘ब्रेन वॉश’ केलं गेलं आहे असा आरोप आता तिच्या भावाने केला आहे. उत्तर प्रदेशातल्या बरेलीमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भावाने बरेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
बरेली पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या एका पोलीस अधिकारी महिलेचं दुसऱ्या समुदायातल्या मुलाशी प्रेम जमलं. त्यानंतर तिने लग्न करायचं म्हणून स्पेशल मॅरेज अॅक्टच्या अंतर्गत अर्जही दिला. यानंतर या प्रकरणात एक ट्विस्ट आला आहे. या महिला अधिकाऱ्याच्या भावाने आता असा आरोप केला आहे की बहिणीचं पद्धतशीरपणे ब्रेन वॉश करण्यात आलं.
महिला पोलीस अधिकारी आणि दुसऱ्या समुदायचा मुलगा या दोघांनी मागच्या महिन्यात लग्न करण्यासाठी अर्ज दिला होता. दोघांचाही धर्म वेगवेगळा असल्याने या दोघांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडिया आणि माध्यमांमधे झाली. असं म्हटलं जातं आहे की हे जोडपं कोर्ट मॅरेज करणार आहे. मात्र आता या महिलेच्या भावाने आरोप केला आहे की माझ्या बहिणीचं पद्धतशीरपणे ब्रेन वॉश करण्यात आलं आहे. या लग्नाला त्याने विरोध दर्शवला आहे. तिच्यासह मध्यम वयाचा ड्रायव्हर होता. तो तिला घरी सोडायला आणि ऑफिसमध्ये सोडायला येत होता. त्याने धार्मिक स्थळी घेऊन जात तिला भुरळ पाडली आहे आणि तिचं पद्धतशीर ब्रेन वॉश केलं असा आरोप त्याने केला आहे.
या महिला अधिकाऱ्याच्या भावाने म्हटलं आहे की माझ्या बहिणीला जाळ्यात ओढून लग्नासाठी राजी केलं गेलं आहे. तिचे काही फोटोज आणि व्हिडीओज काढण्यात आले आहेत. त्यामुळे तो माणूस तिच्यावर लग्नासाठी दबाव आणतो आहे असाही आरोप त्याने केला आहे. तिच्या भावाने एडीजींकडे मागणी केली आहे माझ्या बहिणीची बदली करा. आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.